Monday, May 21, 2012

'डिस्को क्वीन' - डॉना समर


काल नेट वर फेरफटका मारताना अचानक बातमी वाचली, डॉना समरच्या मृत्यूची आणि मन भूतकाळात मागे गेलं, बर्‍यापैकी मागे, पार ८५-८६ सालामध्ये. तेव्हा अस्मादिक कुठेतरी पाचवी-सहावीमध्ये असतानाची गोष्ट.
आमचे बंधुराज आमच्याहून पाच वर्षांनी मोठे. त्यावेळेस ते कॉलेज-कुमार बनून त्यांचा सोनेरी काळ जगत होते नि आम्ही शाळेत स्वतःचं आयुष्य फरफटवत होतो. बंधुराजांचं संगीताशी फारसं देणं घेणं नव्हतं पण तो काळच असा होता की तेव्हाच्या प्रत्येक कॉलेजकुमारांना दोन सांगितीक आवडी नसतील तर त्यांना बहुदा सिरियसली घेतलं जात नसावं. त्यातली एक आवड होती गझलांची आणि दुसरी इंग्लिश डिस्को गाण्यांची.
आम्ही नुकतेच, "अभय आ। नमन कर।" म्हणत हिन्दी शिकत होतो त्यामुळे गझल ऐकताना कठीण शब्द घुसडलेली हिन्दी गाणी ऐकतोय असं वाटायचं. जे ऐकतोय ते काहीसं कळतंय पण वळत मात्र नाही आहे अशी भावना व्हायची पण ते दुसरं इंग्लिश डिस्को प्रकार काहीच कळायचा नाही. हां, पण त्या गाण्यांवर हात-पाय-कंबर हलवत लोकं नाचताना पाहिलेली आणि तसं नाचायचा प्रयत्न करताना जाम मजाही यायची. बाकी आमची नेहमीचीच इंग्लिश अज्ञतेची अडचण! असो. तर सांगत काय होतो की आमच्या बंधुराजांनी त्यावेळच्या नियमांना अनुसरून मित्राची एक कॅसेट कॉपी मारून आणली. त्यावेळच्या पॉप्युलर डिस्को गाण्यांची ती कॅसेट होती. एका दुपारी अस्मादिकांनी दुपारी कुणी नसताना ती कॅसेट लावली. त्यातलं पहिलं गाणं होतं, "She Worked Hard For The Money" आणि गायिका होती डॉना समर. गाण्याचे बोल काय आहेत ते काहीच कळलं नव्हतं पण त्यातले डिस्को बीट्समात्र तेव्हाही एकदम आवडून गेले होते. पहिल्यांदा ऐकल्यावर स्टॉप करून आणि रिवाईण्ड करून मी तेच गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं. सात-आठ वेळा तरी. या सगळ्याची इतिश्री रेकॉर्ड-प्लेयरशी खेळ करतोय असं वाटून आईच्या ओरडण्यात आणि थोडे फटके खाण्यात झाली. (बहुतेक तो ओरडा नि मार, त्या गाण्यातल्या डिस्को-बीट्सने दुपारी तिची झोप उडवल्याचाच तो परिणाम असावा.) नंतर अर्थातच हे गाणं कशाबद्दल आहे ते आमच्या बंधुराजांनाच विचारावं लागलं. तेव्हा त्याने सांगितलं की एक बाई आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी किती कष्ट करून पैसे मिळवतेय हे त्या गाण्यात सांगितलंय.

खरं तर मी तेव्हा त्याच्यावर विश्वासच ठेवायला तयार नव्हतो. माझे कान तो पर्यंत केवळ भारतीय संगीतच ऐकत होते. आपल्याकडे करूण विषयावरची गाणी करूण स्वरांमध्येच असणार असंच गृहितक होतं पण हे गाणं तसं नव्हतं. या गाण्याची सुरावट मला तरी ऐकताना आनंदीच वाटली होती. त्यावेळीही मी फार वाद न घालता गप्प बसलो मात्र हे गाणं मनात रुंजी घालत होतंच. पुढे अनेक वर्षांनी भारतात एम् टिव्ही सुरू झाल्यावर एका दिवशी त्यातल्या 'एम् टिव्ही रिवाईण्ड' नावाच्या कार्यक्रमामध्ये अचानक या गाण्याचे चिरपरिचित सूर ऐकू आले आणि त्यावेळी पहिल्यांदा या गाण्याचा विडिओ बघायला मिळाला. त्यावेळपर्यंत माझं इंग्लिशही काहीसं सुधारलेलं आणि इंग्लिश गीतं समजूनही घेता येत होती.
या गाण्याच्या विडिओमध्ये एका स्त्रीची आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी केलेल्या धडपडीची कथा नीट दाखवलेली आहे. डॉनाने हे गाणं एका हॉटेलमध्ये भेटलेल्या हाऊसकीपिंग स्टाफच्या सत्य परिस्थितीवर लिहिलं होतं. हे लिहिताना तिला मायकल ओमार्टियनने मदत केली होती. गाण्यातल्या नायिकेला डान्सर व्हायचं होतं पण त्याऐवजी तिला पडेल ती कामं करून आपल्या मुलांसाठी पैसे मिळवावे लागतात. पण तिच्या कष्टांची तिच्या मुलांनाही किंमत नसते. विडिओत शेवटी रिकाम्या रस्त्यावर डान्स करताना वेगवेगळ्या गणवेशातल्या मुली दाखवल्यात ज्यांच्यात विडिओतली नायिकाही असते. आपल्या कुटूंबासाठी स्वतःची आवड बाजूला ठेवून पैसा कमवण्यासाठी मिळेल तो रोजगार पत्करणार्‍या मुलींचेच ते द्योतक बनते. अशा मुलींना त्यांच्या कष्टांबद्दल आणि त्यांच्या त्यागाबद्दल योग्य तो मान मिळावा असंच डॉना सांगतेय.
डिस्को संगीतामध्ये नुसताच धिंगाणा न करता काही सामाजिक तथ्यांची व्यवस्थित मांडणी करून त्यांची लोकांना योग्य दखल घेणं देखिल करता येऊ शकतं हे मला या गीतामधून समजलं. मग डॉनाची "Love To Love You, Baby", "No More Tears", "Hot Stuff", "I Feel Love" आणि "MacArthur Park" वगैरे गाणी पुन्हा एकदा ऐकली नि मी डॉना समर्सचा पुन्हा एकदा फॅन झालो. तिची गायकी भन्नाट होती आणि तिने डिस्कोच नाही तर पुढे रॉक, पॉप, न्यू वे म्युझिक इ. निरनिराळ्या प्रकारच्या संगीतामध्ये गाणी बनवली आणि गायली.
'डिस्को क्वीन' म्हणून ओळखल्या जाणार्‍या, सहा वेळा अमेरिकन म्युझिक अ‍ॅवॉर्ड आणि पाच वेळा ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स जिंकणार्‍या नि माझ्या आवडत्या 'डॉना समर्स'ची मित्रांना थोडक्यात ओळख करून देण्याचा माझा एक प्रयत्न.
ईश्वर डॉनाला त्याच्या चरणी जागा देवो हीच प्रार्थना!
डॉना समरचं "She Worked Hard For The Money" हे गीत -
She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.

Onetta here in the corner stand and wonders where she is.
And it's strange to her, some people seem to have everything.
9 am on the hour hand and she's waiting for the bell.
And she's looking real pretty. She's waiting for her clientele.

She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.

Twentyeight years have come and gone.
And she's seen a lot of tears
of the ones who come in. They really seem to need her there.
It's a sacrifice working day to day. For little money just tips for pay.
But it's worth it all just to hear them say that they care.

She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.

She already knows she's seen her bad times.
She already knows these are the good times.
She'll never sell out, she never will, not for a dollar bill.
She works haaaaard.........

Sax Solo
Git Solo

She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.

No comments:

Post a Comment