Sunday, October 30, 2011

'ईगल्स' भरारी

१९७० च्या दशकात लॉस एंजलीस मध्ये तयार झालेला, अमेरिकेतील चार्टस मध्ये ५ पहिल्या क्रमांकाची गाणी देणारा, ६ ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स जिंकणारा, ६ पहिल्या क्रमांकाचे अल्बम असणारा म्युझिक ग्रूप म्हणजे 'ईगल्स'.

ग्लेन फ्रे, डॉन हॅनली, बर्नी लीडन आणि रँडी मीस्नर यांच्या या 'ईगल्स'ची गोष्टच जरा वेगळी आहे. मुळात यांच्यातील एकही म्युझीशियन कलिफ़ोर्निअन नाही. हे चौघे १९७१ साली प्रसिद्ध अमेरिकन गायिका 'लिंडा रॉनस्टेट' हिचे टूर-मेम्बर्स म्हणून लॉस एंजलीस, कॅलिफोर्नियाला एकत्र आले. एकत्र काम करता करता त्यांचा एक छान गट बनला. ''लिंडा'ने स्वत:च त्यांना त्यांचा स्वतंत्र म्युझिक ग्रूप बनवण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच 'ईगल्स'चा जन्म झाला.

अनेक प्रसिद्ध गाणी देणारा हा ग्रूप सुरुवातीला अमेरिकन कंट्री (लोकसंगीत) सादर करायचा पण पुढे प्रथितयश रॉक ग्रूप म्हणून नावाजला गेला. १९७१ पासून बनलेला हा ग्रूप १९८४ मध्ये फुटला आणि त्यातील प्रत्येकाने आपले स्वतंत्र सांगीतिक करिअर केले. १९९४ साली त्यांचे रीयुनियन होऊन 'ईगल्स' पुन्हा एकदा जोमाने आपलं संगीत सादर करत आहेत. दरम्यान काही सभासद गळले, काही नवे आले. सध्या 'ईगल्स', ग्लेन फ्रे, डॉन हॅनली सह जो वॉल्श आणि टिमूथी श्मीट यांचा ग्रूप आहे.



या अशा 'ईगल्स'चं इथे एक गाणं देतो. मला खात्री आहे की हे सगळ्यांना नक्कीच आवडेल.....

"Hotel California".

त्यावेळचा ग्रूप मेंबर डॉन फेल्डर याचे प्रमुख म्युझिक संयोजन असलेलं हे गाणं डॉन हॅनली, ग्लेन फ्रे आणि स्वत: डॉन फेल्डर यांनी लिहिलेलं आहे. फेल्डर स्वत: गायक नव्हता पण चांगला वादक आणि संगीतकार होता. त्याने तयार केलेल्या संगीताने बाकी जण खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्या संगीतावर गीतलेखनाला सुरुवात केली. त्या काळात कॅलिफोर्निया मध्ये एक वैशिष्ठ्यपूर्ण मतप्रणाली जोरावर होती. कोणतीही कृती ही त्यात किती जास्त सुख आणि किती कमी दु:ख यातच मोजली जायची. या प्रणालीच्या अनेक उपकल्पना होत्या, त्यातलीच एक होती, असं ठिकाण की जिथे जायचे तुम्ही ठरवता पण त्यातून बाहेर पडायची कृती करायचे अधिकार तुम्हाला नाहीत, अशी काहीशी...... या अशाच कल्पनेवर हे गाणं बेतलेलं आहे.

एक भटका प्रवासी 'हॉटेल कॅलिफोर्निया' मध्ये येतो. इथे सगळा झगमगाट आहे, उपभोगाची सर्व साधनं आहेत आणि इथे तुम्ही हवं ते करू शकता पण इथून बाहेर मात्र पडू शकत नाही. एकदा आत आलात की तुम्हाला यातल्या परिस्थितीचे घटक बनूनच राहणं आवश्यक होतं. दुसरे सर्व मार्ग बंद होतात आणि तुमचा तुमच्यावर काहीच कंट्रोल राहत नाही. परिस्थिती प्रवाह-पतितागत होते. ज्योतीवर झेपावणार्‍या पतंगासारखी त्याची अवस्था होते, त्याला कळतंय की यात नाश आहे पण ते थांबवणं त्याला शक्य नसतं. एक प्रकारे त्याच्या स्वत:च्या आयुष्याच्या कल्पना उध्वस्त होतानाच त्याला दिसतात.

(जणू एखादे आजच्या काळासारखे अमेरिकन ड्रीम, तुम्ही स्वेच्छेने अमेरिकेत जाऊ शकता पण तिथून तुम्हाला परतणं कितीही मनात आणलं तरी शक्य होत नाही किंवा मग आपल्या हिंदी सिनेमांमध्ये म्हणतात तसं, "गुनाहोंके दुनियामें आप कदम तो अपनी मर्जीसे रखतें हैं मगर वहाँसे बाहर अपनी मर्जीसे नहीं निकल सकते।".... हे असं आपलं मला एकूण या गाण्याच्या अर्थावरून वाटतंय...)

यातला शेवटचा गिटारवरचा भन्नाट म्युझिक-पीस कोणत्याही वादकाला आपल्याला वाजवता यायलाच हवा अशी महत्त्वाकांक्षा पैदा करणारा आहे. टोटल जबरा......



१९९४ च्या रीयुनियन नंतर झालेल्या एका कार्यक्रमात या गाण्याचं अ‍ॅकॉस्टिक वर्जन ऐकायला मिळतं..... पुन्हा एकदा...... निव्वळ अप्रतिम.......
"Love Will Keep Us Alive"

'ईगल्स'चा विषय चालू आहे तर त्यांची आणखी काही खास गाणी इथे द्यायला कोणतीही हरकत नसावी.
त्यांच्या १९९४च्या रीयुनियनच्या वेळी त्यांचं एक गाणं प्रसिद्ध झालं. जीम कापाल्डी, पौल कार्रेक आणि पीटर वेल यांनी लिहिलेलं, "Love Will Keep Us Alive", हे ते गाणं. मुळात हे पॉलने श्मीट या गिटारिस्टसाठी, ते जेव्हा एकत्र म्युझिक ग्रूप बनवण्याचा विचार करत होते तेव्हा बनवलेलं. पण त्यांचा तो मनसुबा काही प्रत्यक्षात येऊ शकला नाही. पुढे श्मीट ईगल्स ग्रूप मध्ये सहभागी झाल्यावर त्याने हे गाणे ईगल्स रीयुनियन टूर-प्रोग्रामसाठी वापरले. या गाण्याची जातकुळी मूळ ईगल्सच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या प्रेमगीतांसारखीच असल्याने ईगल्सने ते आपल्या नावावर सादर करणं स्वाभाविकच होतं.....

तुम्हालाही आवडेल हे गाणं, त्यातले शब्द आणि ईगल्सचं सुंदर सादरीकरण......


"Take It Easy"

"Take It Easy" हे ईगल्सचं आणखी एक सुंदर गाणं, त्यांची 'सिग्नेचर ट्यून'च!

जॅकसन ब्राउनी आणि ग्लेन फ्रे यांनी लिहिलेलं हे गाणं फ्रे यानेच गायलेलं आहे. 'रॉक एन रोल' लोकप्रिय होण्यामध्ये या सारख्या गाण्यांचा खूप मोठा हातभार आहे.

या गाण्याची पार्श्वभूमी बघा, ब्राउनी ने स्वत:च्या पहिल्या अल्बमसाठी हे गाणं लिहायला सुरुवात केली. पहिलं कडवं लिहून झाल्यावर त्याचा त्यावेळचा शेजारी फ्रे याने ते ऐकलं तर त्याला ते फारच आवडलं. तेव्हा ब्राउनीने हे गाणं फ्रेच्या नव्या ग्रूपसाठी (ईगल्स) देऊन टाकलं. नंतर फ्रे ने याचं दुसरं कडवं लिहीलं आणि ते ईगल्स तर्फे सादर केलं. पुढे ब्राउनीने स्वत:च्या ग्रूप बरोबरही हे गाणं गायलं पण आधी म्हंटल्याप्रमाणे ते ईगल्सचीच सिग्नेचर ट्यून मानलं गेलं....

तेव्हा ही ईगल्स ची सिग्नेचर ट्यून ऐकायलाच हवी. इथे हे गाणं मस्त ऐकू येतं.....


ही गाणी केवळ एक झाँकी आहेत म्हणू. लिहावं तितकं थोडं. ज्याने-त्याने आपली आवड जोपासावी नि वाटावी, यामुळे आपण एकमेकांच्या जीवनात आनंदच वाटणार आहोत, नाही का?

आज इतक्या वर्षांनंतरही जगभरातून अनेक लहान-थोर मंडळींसाठी 'ईगल्स' आणि ईगल्सची गाणी ही मर्मबंधातली ठेव आहे. अनेकदा यांच्याकडून ईगल्सच्या संगीताचा गुणवत्तेच्या कसोटीवर फूटपट्टीसारखा वापर होतो. याला कारणही आहेच -

'इगल्स' रॉक अ‍ॅण्ड रॉल संगीतक्षेत्राच्या आकाशात तीस वर्षांनंतरही तितक्याच ताकदीने भरार्‍या मारत आहे.


Tuesday, October 25, 2011

'एरीक क्लॅपटन'

साधारण साठच्या दशकात, काऊण्टर कल्चर, हिप्पी कल्चरच्या गदारोळात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज रत्ने हाती गवसली. त्यातलं महत्त्वाचं नाव , म्हणजे 'एरीक क्लॅपटन'. अत्युच्च प्रतीचा गीतकार, संगीतकार आणि गायक. जगातल्या सर्वात उत्तम गिटारवादकांपैकी एक. काळाचा प्रभाव म्हणा वा ग्रहदशा, याचं जीवन अत्यंत वादळी आहे आणि हे वादळ त्याच्या गीतांमध्ये, संगीतामध्ये संपूर्णपणे दिसून येतं.




३० मार्च १९४५ रोजी रीप्ली, सरे, इंग्लंड मध्ये जन्मलेल्या एरिकचं जीवन जरा निराळच आहे. त्याचे वडील क्युबेक-कॅनडाचे सैनिक होते आणि त्याचा जन्म व्हायच्या आधीच ते कॅनडात परतले होते. तो जन्मला तेव्हा त्याची आई पॅट्रीशिया फक्त सोळा वर्षाची होती. पुढे अनेक वर्ष एरीक आपल्या आईला आपली मोठी बहिण आणि आपल्या आजीला आपली आई मानायचा. पुढे त्याची आई लग्न करून कॅनडातच गेली आणि एरीक आपल्या आजीकडेच मोठा झाला.

वयाच्या १३व्या वर्षी एरीकला पहिली गिटार भेट मिळाली. आधी त्याला हे वाद्य नीट जमेना पण दोनेक वर्षांनी त्याने स्वत:ला कसोशीने गिटार वादक बनवले. तासन्तास ब्लूज धर्तीच्या गिटार वादनाचा तो अभ्यास करायचा. त्याने या ध्यासापायी आपलं कला शाखेचं शिक्षणही अर्धवट सोडून दिलं. पण परिणामी एरीकचं गिटार वादन इतकं सुधारलं की वयाच्या १६ व्या वर्षीच संगीतक्षेत्राने त्याच्या वादनाची दखल घेण्यास सुरुवात केली.

यार्ड बर्ड, क्रीम, ब्लाईन्ड फेथ, डेलनी अ‍ॅण्ड बोनी अ‍ॅण्ड फ्रेंड्स आणि डेरेक अ‍ॅण्ड द डॉमिनोज अशा म्युझिक ग्रूप्स मध्ये एरीकची गिटार धुमाकूळ घालू लागली. अशा प्रकारे आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला अनेक प्रतिथयश गायकांना, त्यांच्या ग्रूप्सना आपल्या गिटारने साथ करणारा एरीक आपल्या प्रभावशाली वादनाने खूप प्रसिद्धीला आला. पण प्रसिद्धी बरोबरच त्याला मिळाली अमली पदार्थांची सवय. कोकेन आणि दारूने त्याला पार जखडून टाकलं. असं असूनही त्याला अशा आयुष्यातून तारलं केवळ त्याच्या संगीताने!
एक वेळ अशीही आली की जॉर्ज हॅरीसनच्या प्रसिद्ध 'बांगलादेश कॉन्सर्ट'च्या वेळी अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एरीक रंगमंचावरच बेशुद्ध झाला पण तिथे लगेच त्याला शुद्धीवर आणले गेल्यावर त्याने पुन्हा आपले वादन सुरू करून कार्यक्रम पूर्णत्वाला नेला. त्या 'बांगलादेश' कॉन्सर्ट मधलं एरीकच्या इलेक्ट्रीक गिटारच्या वादनाने नटलेलं जॉर्जचं एक अप्रतिम गाणं ऐका.




त्याच्या आयुष्यातील वादळी घटनाही त्याच्या व्यसनाला पूरक ठरल्या. जॉर्ज हॅरीसन या बीटल्सच्या गायक-संगीतकाराला साथ देता देता एरीक त्याच्या बायकोच्याच, 'पॅटी बॉइड'च्या प्रेमात पडला. हे त्याच्या वादळी जीवनातलं एक चक्रीवादळच होतं. यामुळे आधीच धुमसणारं जॉर्ज-पॅटीचं लग्न मोडलं. पॅटीच्या प्रेमात आकंठ बुडालेला एरीक तिला उद्देशून गाणी लिहू लागला जी पुढे खूप प्रसिद्ध झाली. (पुढे एरीक पॅटीशी विवाहबद्धही झाला.)

पुढे दिलेलं हे गाणंही त्यापैकीच एक.... पार्श्वभूमी सोडा, पण गीत, संगीत आणि गायन म्हणून या गाण्याला अजिबात तोड नाही..... 'एरीक' ने पार तोडलंय आपल्याला.....!!!


पॅटीसाठी एरीक ने लिहिलेलं आणखी एक गाणं......

हे तिच्याशी लग्न करण्याआधी लिहिलेलं आणि तिचंही हे एरीकने लिहिलेल्या आणि गायलेल्या गाण्यांपैकी सर्वात आवडतं गाणं आहे. एरीकाला त्याच्या मित्राने 'निजामी गंजवी'चं लैला आणि मजनू वरचं एक पुस्तक भेट दिलेलं होतं. या त्याच्या अत्यंत आवडत्या पुस्तकात एरीकाला त्याचंच प्रतिबिंब दिसलं. एका अप्राप्य लावण्यवतीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मजनुमध्ये एरीक स्वत:चंच रूप बघू लागला. त्या धुंदीतच या जबरदस्त गाण्याचा जन्म झाला.

अर्थात आपल्यालाही हे ऐकायला आवडेल.....


एरीकने इतरही गाणी उत्तमरीत्या गायली आहेत.

'बॉब मर्ली'च्या "I shot the Sheriff" या गाण्याचं एरीकचं व्हर्जन त्याचाच नमुना आहे.....

एरीक च्या गिटार वादनाला खरंच तोड नाही यारों....!


आधी म्हंटल्याप्रमाणे एरीकचं जीवन खरंच वादळी आहे.

१९९१ साली एरीकचा मुलगा 'कॉनर' (एका इटालियन मोडेल पासून झालेला, ज्या प्रकरणामुळे एरीक आणि पॅटी बोईड यांचं लग्न मोडलं.) आपल्या आईच्या मैत्रीणीच्या घराच्या खिडकीतून अपघाताने खाली पडला. ४ वर्षांचा 'कॉनर' ५३व्या मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू पावला. या घटनेने एरीकला खूप मोठा धक्का बसला. तो अनेक महिने अस्वस्थ राहिला. या अपघाताची दु:खद आठवण म्हणून त्याने गीताचे एक कडवे लिहिले. पुढे विल जेनिंग बरोबर त्याने यावर थोडे अधिक संस्कार करून त्याचे संपूर्ण गाणे बनवले. ते गाणे म्हणजे "Tears in Heaven".

या गाण्याला १९९२ सालची ३ ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स मिळाली आणि बिलबोर्ड काऊन्ट-डाउन मध्ये ते २ र्‍या क्रमांकापर्यंत गेलं. हे गाणं पुढे "Rush" नावाच्या चित्रपटात वापरलं गेलं. २००४ नंतर एरीकने हे गाणं गायचं थांबवलं. त्याच्या म्हणण्यानुसार तोपर्यंत त्याची ती मानसिक जखम बर्‍यापैकी भरून आली आणि ती वेदना न जाणवता गाणं केवळ परफॉर्म करणं अयोग्य होतं.

या गाण्यात एरीक मधल्या बापाचं प्रेम आणि दु:ख असं व्यक्त होतं की आपलेही डोळे भरून येतात.....


जबरदस्त, दणदणीत आणि एकदम 'हेवी' ब्लूज म्युझिक ऐकायची आवड असेल तर 'एरीक क्लॅपटन'च्या "Have you ever loved a woman" या गाण्याला पर्याय नाही. 'बिली माईल्स'ने लिहिलेलं हे गाणं आधी ब्लूज गायक 'फ्रेडी किंग'ने म्हंटल होतं पण तेव्हा फार गाजलं नाही. पण जेव्हा एरीकच्या गिटार आणि आवाजाचा स्पर्श त्या गाण्याला झाला तेव्हा सर्वोत्तम ब्लूज गाण्यापैकी ते एक मानलं जाऊ लागलं.


"Old Love" हे गाणं एरीक ने त्याची पत्नी 'पॅटी बोइड' बरोबर काडीमोड केल्यानंतर लिहिलेलं आहे. दोघांच एकमेकांवर प्रेम होतं पण ते टिकू शकलं नाही. ते वेगळे झाले आणि या विवाह-च्छेदनाने प्रेरित होऊन 'एरीक'ने हे गाणं लिहीलं. आपल्या एके काळच्या प्रिय पत्नी बरोबर होत असलेल्या वा झालेल्या घटस्फोटाच्या अनुभवातून जाणार्‍या पुरुषाची मानसिकता या गाण्यात दिसून येते.

२००८ साली 'पटी' 'गार्डियन' वृत्तपत्रातील मुलाखतीत म्हणाली, "हे गाणं माझ्यासाठी खूपच वेदनादायक आणि दु:खद होतं, एक तर ते आमच्या घटस्फोटाच्या संदर्भातलं त्याचं ('एरीक'चं) म्हणण होतं जे म्हंटल तर आमची खाजगी बाब होती, मलाही त्या घटनेने (घटस्फोटाच्या) दु:ख झालेलं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी 'एरीक'ला या बाबतीत गाण्याच्या मार्गाने कधीच प्रत्युत्तर देऊ शकणार नव्हते......"


एरीक पाश्चात्य संगीत क्षेत्रात अगदी लेजंडपदाला पोहोचलेला आहे. आज म्हंटल तर वादळ ब-यापैकी माणसाळलंय. अनेक संगीतकारांच्या ट्रीब्युट कॉन्सर्ट्सना तो आपल्या उपस्थितीने आणि सहभागाने चार चाँद लावतो. त्याची संगीत सेवाही अजून सुरूच आहे. जॉर्ज हॅरीसनच्या मृत्युनंतर दोन वर्षांनी झालेल्या "कॉन्सर्ट फॉर जॉर्ज" मध्ये एरीकने त्याचे "While My Guitar Gently Weeps" हे गाणे सादर केले (ही कॉन्सर्ट एका वेगळ्या लेखाचा विषय होईल) हा त्याचाच भन्नाट पुरावा!


माझ्या या अत्यंत आवडत्या कलाकाराची, 'एरीक क्लॅपटन'ची माझ्या मित्रांना ओळख करून देण्याचा माझा हा छोटासा शाब्दिक प्रयत्न!

(डिस्क्लेमर - एरिकचे छायाचित्र आंतरजालावरून साभार, गाण्यांचे विडिओ यु-ट्यूबवरून साभार)


Sunday, October 23, 2011

'ट्रेसी चॅपमन'

खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर पाहिलेला एक 'ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड'चा प्रोग्राम अचानक आठवला. वय लहान, अगम्य भाषा, शब्द फक्त दोन समजतायत, 'फास्ट कार' पण लक्षात राहतेय केवळ अप्रतीम संगीत आणि एक जबरदस्त आवाज....

हे ऐकताना अगदी मोहून गेल्यागत झालेलं....

गायिका होती 'ट्रेसी चॅपमन' आणि गाणं होतं "फास्ट कार".

संपूर्ण व्हिडिओ मध्ये एक गंभीर बाई, कुठलाही भडकपणा न करता आपल्या संगीतात ऐकणार्‍याला झुलवत ठेवतेय असं काहीसं जे तेव्हा जाणवलेलं ती भावना आजही कमी झालेली नाही....

तुम्हाला काय वाटतं....?


ट्रेसी मूळची क्लीव्हलँडची. एकट्या आईने वाढवलेली. गरीबीतही तिची संगीताची आवड तिच्या आईने जोपासली. शाळेत खास वर्गासाठी ती निवडली गेली आणि तिच्या प्रतिभेला एक चांगली वाट मिळाली. शिक्षणाचं महत्त्व जाणणार्‍या ट्रेसीने ट्रफ्ट विद्यापीठातून कला शाखेत पदवी मिळवली. याच विद्यापीठाने पुढे तिच्या सांगितिक आणि सामाजिक योगदानासाठी मानद डॉक्टरेट दिली.

वयाच्या आठव्या वर्षापासूनच ट्रेसी गाणी लिहायला लागली. ट्रेसीची सर्व गाणी तिने स्वत:च लिहिलेली आहेत आणि संगीतही तिचेच आहे. ती स्वत: गिटार फार छान वाजवते. तिच्यातली गीतकार सामान्यांच्या जीवनातील अनुभवांना कवितेचे रूप देते तर तिच्यातली संगीतकार त्या कवितेला गाणं बनवते जे जनसामान्यांच क्रांती-गीतच बनून जातं.

ट्रेसी चं "Talkin' about a Revolution" हे गाणं खरोखर क्रांतीचं 'अ‍ॅन्थम' बनण्याइतकं सुंदर आहे.

जरूर ऐका....


ट्रेसी चापमन एक जबरदस्त कवयित्री आहे. ती अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे. प्रेमाच्या नात्यातील चढ-उतार यांची तिला जाणीव आहे. प्रेमीजन कधी काही कारणांनी दूर जातात आणि काही काळाने पुन्हा जवळही येतात. अशांच्या भावभावनांच्या कल्लोळांचे विचार ती इथे किती हळूवारपणे व्यक्त करते ते "Baby can I hold you" या तिच्या अत्यंत लोकप्रिय गाण्यातच ऐका. 


तसेच काहीसे विचारही इथे "Give me one reason" या गाण्यात ऐकण्यासारखे आहेत.


ट्रेसी मधली कवयित्री वाढत्या वयाची मुलं असलेल्या आईच्या भावना "Sing for you" या गाण्यात फार छान व्यक्त करते. यातले शब्द आणि त्याबरोबरचं ते डू डू डू.... फारच सुंदर परीणाम करून जातं तेव्हा जरा इथेही कान द्या.......



समाजामधल्या अपप्रवृत्तीन्च्याविरुद्ध ती स्वत:च्या गाण्यांमधून आणि कवितांमधून आवाज उठवते. तिच्या शब्दांनाच अशा वेळी धार येते आणि कोणत्याही वाद्य-संगीताशिवाय तिचा आवाज या अपप्रवृत्तींवर घाव घालू लागतो.

याचं मूर्तीमंत उदाहरण तिचं "Behind the wall" हे गाणं आहे. यातील शब्द न शब्द समाजातील घरगुती हिंसेच्या (Domestic violence) प्रवृत्तीवर आसूड ओढू लागतो.

ऐकाच........


समाज कुठेही असला तरी त्यातील स्त्रियांची स्थिती काही फार वेगळी नसते, मग तुम्ही भारतात असलात, युरोपात असलात किंवा अमेरिकेत.... ट्रेसी आपल्या एका गाण्यात हेच अधोरेखित करते.

कधीही केव्हाही स्त्रीकडे तिची स्वत:ची अशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे तिचा आत्मा! या आत्म्यावर तिच्याशिवाय इतर कोणाचाही अधिकार नसतो. पण ती स्वत:च हे विसरते आणि जीवनातील अनुभवांचे टक्के-टोणपे खाल्यानंतर तिला पुन्हा हे ज्ञान होते. अशी स्त्री आपल्या मुलीला मात्र आधीच याची जाणीव करून देते आणि ज्या अनुभवांतून तिला जावं लागलेलं असतंय त्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवायचा प्रयत्न करते. हे सर्व सांगताना ट्रेसीचे शब्द आणि संगीत अगदी काळजाला हात घालतात.


सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये राहणारी ट्रेसी आजही अनेक ठिकाणी सामाजिक कार्यांसाठी आपले कार्यक्रम करते. मात्र तिने आपले व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य यांची सरमिसळ केलेली नाही. ट्रेसीसारखे कलाकार आपल्या शब्दांनी आणि सूरांनी आपलं जीवन खरंच खूप समृद्ध करत असतात. ट्रेसीची गाणी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच माझ्याशी सहमत असाल याची खात्री आहे.


Tuesday, October 11, 2011

'नीम का पेड' आणि त्याचं शीर्षक गीत - मूँह की बात सुने हर कोई

९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय.

कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे. मग ते त्याच्या महत्त्वाची कागदपत्र कुठे नेऊन द्यायचं काम असो किंवा त्याच्या बहिणीच्या सासरी काही भेट-वस्तू द्यायचं काम असो, तो बुधाई रामलाच ते करायला सांगणार आणि वरती गावाबाहेर जिथे कुणाकडे पाठवलं असेल तिथून ताबडतोब परतही यायला सांगणार. मग बुधाई रामही त्याच्या सांगण्याप्रमाणे जराही दम न खाता ते काम करून लगेच परतणार. जमीनदाराचा इतर कुणापेक्षाही जास्त विश्वास बुधाई रामवरच असतो. एक दिवस बुधाईच्या सेवेचं बक्षीस म्हणून जमीनदार त्याला एक निंबाचं रोपट देतो आणि त्याला त्याच्या घराजवळ ते लावायला सांगतो. तो हे ही सांगतो की ते रोप वाढलं आणि त्याचा वृक्ष झाला तर त्या झाडाची सावली इतकी जमीन त्याची.

बुधाई आपल्या घरासमोर ते रोप रुजवतो आणि कालांतराने त्याचा वृक्ष बनतो आणि त्याखालच्या सावलीची जमीन त्याची होते असं तो मानतो. बुधाईच्या अगदी साध्या इच्छा-आकांक्षा असतात. आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि आपल्यासारखा हरकाम्या न बनता जीवनात यशस्वी व्हावं. पण दरम्यान जमीनदाराचं त्याच्या मेहुण्याबरोबर (बहिणीचा नवरा) इस्टेटीवरून वाद होतो आणि या वादात निंबाच्या सावलीची जमीन आपली समजणारा बुधाईही ओढला जातो आणि सुरू होतो एका सामान्य माणसाचा आपली जमीन वाचवण्यासाठीचा लढा. त्याचा मुलगा सुखाई त्याच्या इच्छेप्रमाणे शिकून या लढ्यात बुधाईचं अस्त्र बनतो आणि त्यांच्या जमिनीसाठी लढणा-या दोन्ही जमिनदारांना पुरून उरतो. पुढे खासदार बनलेल्या सुखाई रामने आपल्या मेहुण्याविरुद्धच्या इस्टेटीच्या तंट्यात मदत करावी म्हणून जमीनदार ती निंबाच्या झाडाखालची जमीन बुधाईला कायमची बक्षीस म्हणून देऊन टाकतो आणि अखेर बुधाई निंबाच्या झाडाखालच्या जमिनीचा कायदेशीर मालक बनतो.

अशी काहीशी कथा असणा-या या मालिकेत नेमकं चांगलं काय होतं ते आत्ता व्यवस्थित कळतंय. 

पहिलं म्हणजे बुधाई रामचं काम करणारा होता पंकज कपूर. पंकज कपूर हे काम करत होता म्हंटलं तर चुकीचं होईल. तो ती भूमिका जणू जगत होता. एका जवळ जवळ वेठबिगारी करणा-या माणसाला निंबाच्या झाडाने दिलेली एक छोटीशी आशा, पुढे त्या माणसाला त्या झाडाशीच संलग्न करते ते पंकज कपूरने अप्रतिमरीत्या दाखवलं होतं. असं म्हणतात की नाटकातलं एक पात्र हे जबरदस्त ताकदीचं तेव्हाच वाटतं जेव्हा त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचं विरोधी पात्र असतं. पंकज कपूरच्या बुधाईसमोर असं जमिनदाराचं पात्र रंगवलेलं एस. एम. झहिर यांनी. त्यांनी जमिनदाराचा आढ्यतखोर स्वभाव, मुरब्बी राजकारणीपणा, मुजोरपणा आणि आधी मेहुण्यासमोर आणि नंतर सुखाईसमोर आलेली अगतिकता खुमासदार रीतीने दाखवली आहे. या दोघांना तश्या भूमिका ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीने निर्माण करून दिल्या ते होते प्रसिद्ध कथाकार, पटकथाकार आणि शायर डॉ. राही मासून रजा. या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं गुरबीर सिंह ग्रेवाल यांनी. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारासचं उत्तर भारतातलं गाव, तिथली जमिनादारीची प्रथा, वेठबिगा-यांचं आयुष्य रजा-ग्रेवाल जोडीने फारच छान निर्माण केलेलं.

पण हे सर्व असूनही या मालिकेचा उत्कर्ष बिंदू होता त्याचं शीर्षक गीत. निदा फाजली या जबरदस्त शायरचे चपखल शब्द आणि त्या शब्दांना साजेसा जगजीत सिंहांचा अप्रतिम स्वर. मालिका आणि शीर्षक गीत यांचा समर्पक संबंध असेलच असं आपल्याला नेहमीच दिसत नाही पण जितकी ही मालिका सुंदर होती तितकंच त्याचं हे शीर्षक गीतही.

जगजीत सिंहांच नुकतंच झालेलं देहावसान मला या गीताची आठवण करून गेलं. या आणि अशा सुंदर गीतांद्वारे ते अजूनही आपल्यात उपस्थित आहेत. 

मूँह की बात सुने हर कोई,
दिल के दर्द को जाने कौन
आवाजों के बाज़ारों में,
खामोशी पहचाने कौन !!

सदियों-सदियों वही तमाशा,
रस्ता-रस्ता लम्बी खोज,
लेकिन जब हम मिल जाते हैं,
खो जाता हैं जाने कौन !!

वो मेरा आईना हैं,
मैं उस की परछाई हूँ,
मेरे ही घर में रहता हैं,
मुझ जैसा ही जाने कौन !!

किरन-किरन अलसाता सूरज,
पलक-पलक खुलती नींदें,
धीमे-धीमे बिखर रहा हैं,
ज़र्रा-ज़र्रा जाने कौन !!

-निदा फ़ाज़ली


 

Monday, October 10, 2011

'क्वीन' - फ्रेडी मर्क्युरीची जादूगारी

झांझिबार मध्ये भारतीय पारशी आई-बापाच्या पोटी जन्मलेला एक मुलगा फारोख बलसारा शिक्षणासाठी भारतात येतो, मुंबई मध्ये, दादर (पूर्व) च्या पारशी कॉलनीमध्ये राहतो आणि शालेय शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जातो. गीत-संगीतामध्ये लहानपणापासून रस असणारा फारोख लंडन मध्ये कलेचं रीतसर शिक्षण घेतो आणि संगीतामध्येच करीअर करतो. त्यात इतकं नाव मिळवतो की जगातल्या सर्वोत्तमांपैकी एक म्हणून गणला जातो. फारोख बलसारा म्हंटल तर चटकन कळणार नाही पण "फ्रेडी मर्क्युरी" म्हणताच दर्दी रसिक नि संगीतज्ञ कान टवकारल्याशिवाय राहायचे नाहीत.

'फ्रेडी'ने १९७१ मध्ये 'ब्रायन मे', 'रॉजर टेलर' आणि 'जोन डेकन' यांच्याबरोबर ग्रूप बनवला आणि त्याला नाव दिलं 'क्वीन'.

'फ्रेडी' नि 'क्वीन' ची अनेक गाणी गाजली. काहींचा इथेही परामर्श घेऊच पण सुरुवात एका अतिशय कॉम्प्लेक्स गाण्याने करुया.....

"Bohemian Rhapsody".'फ्रेडी'चं तुफान लोकप्रिय गाणं.

यातले 'फ्रेडी'चे सांगीतिक प्रयोग भल्याभल्यांना अचंबित करतात. सुरुवातीला त्याचे पियानोवरचे सुंदर इंट्रोडक्शन त्यानंतर बेले संगीत, पुढे 'ब्रायन मे'ची भन्नाट गिटार आणि अचानक सुरु होणारं ओपेरा स्टाईलचं संगीत, ते संपता संपता चालू होणारं हार्ड रॉक म्युझिक आणि शेवटाकडे जाता जाता आर्त करणारा 'फ्रेडी'चा पियानो आणि त्याचा स्वर.........

अशाप्रकारे आपल्यावर 'फ्रेडी' संगीतातून गारुड करत असताना त्याचे शब्द छळू लागतात. अजूनही या गीताचा अर्थ काय आहे यावर रसिकांच्या चर्चा झडतात. स्वत: 'फ्रेडी'ने हा भाग गुलदस्त्यातच ठेवलाय. तो म्हणून गेलाय,

"It's one of those songs which has such a fantasy feel about it. I think people should just listen to it, think about it, and then make up their own minds as to what it says to them...
...Bohemian Rhapsody" didn't just come out of thin air. I did a bit of research although it was tongue-in-cheek and mock opera. Why not?"

तेव्हा या "Bohemian Rhapsody" चा आनंद लुटू या......



'फ्रेडी' आणि त्याचा ग्रूप 'क्वीन' म्हणजे एक भन्नाट रसायन होतं.

मूळचा अंतर्मुख 'फ्रेडी' 'लाईव्ह' कार्यक्रम सादर करू लागला की प्रचंड बहिर्मुख व्हायचा. संपूर्ण स्टेजभर वावरायचा, जसा तिथला अनिभिषिक्त सम्राट, सळसळती उर्जाच जणू......

दोन वर्ष सलग टूरिंग केलं 'क्वीन'ने. अगदी पार दक्षिण अमेरिकेपर्यंत. एकेका शोमध्ये लाखालाखाने प्रेक्षक असायचे. संगीताचा ध्यास इतका की आंतरराष्ट्रीय बॉयकॉट असलेल्या दक्षिण आफ्रिकेतही कार्यक्रम केले.
गाणीही जबरदस्त. त्यांचं "We Are The Champions" हे गीत क्रीडाक्षेत्रात सर्वच खेळांमध्ये 'विजयगीत' म्हणून वाखाणलं गेलं.

'फ्रेडी'च्या गाण्यांचा आनंद घ्यावा त्याच्या लाईव्ह शोज मध्येच......





'क्वीन'चं आणखी एक गाणं न देऊन राहावत नाही आहे.

'ब्रायन मे'चं "We Will We Will Rock You".

एका कार्यक्रमात 'क्वीन' प्रेक्षकांना आपल्या संगीतात सहभागी करत असताना प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून 'ब्रायन मे'ने या गाण्याची निर्मिती केली. शब्दही त्याचेच आणि 'फ्रेडी' गायक. रॉक संगीताचं हे 'एन्थम' बनून गेलं.....

केवळ पायाचे स्टेम्पिंग (आपटणे) आणि टाळ्या यांचा ताल असणा~या गाण्यात शेवटी 'ब्रायन'ची गिटार सोल्लिड वाजते.....



"Another One Bites The Dust" हे 'क्वीन'चं आणखी एक chart Topper गाणं.

या गाण्याचं क्रेडीट जातं 'क्वीन'चा बेस गिटारीस्ट 'जोन डेकन'ला, गीत, संगीत आणि झकास वादनाचंही.... 'फ्रेडी' हे गाणं गातोही मस्त!

हेवी बास ~हिदम असलेलं हे गाणं एकदम झकास आहे......



१९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकचं 'थीम साँग' बनवण्यासाठी 'फ्रेडी'शी संपर्क साधला गेला. बार्सिलोनामध्येच जन्मलेली आणि तिथेच वास्तव्यास असलेली प्रसिद्ध ओपेरा गायिका 'मोंटेसेरा कबाल' हिच्यासह ओपनिंग सेरेमनीमध्ये गाण्यासाठी द्वंद्वगीत बनवण्याची जबाबदारी 'फ्रेडी'वर टाकण्यात आली.

आणि 'फ्रेडी'ने गीत लिहिले "Barcelona!"

'मोंटेसेरा'चे स्पानिश बोल आणि 'फ्रेडी'चे इंग्लिश शब्द यांचा अप्रतिम मिलाप आणि त्याला कर्णमधुर ओपेरा संगीताची जोड..... अगदी अद्वितीय गाणं तयार झालं.....



पण ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनी मध्ये 'फ्रेडी'ला ते गाता आलं नाही. कारण त्यापूर्वीच १९९१ला त्याचं एड्सने निधन झालेलं. (या रोगाने घास घेतलेला पहिला मोठा संगीतकार) पण तरीही या गाण्यातली त्याची जागा कोणी भरून काढूच शकणार नव्हतं.

ओपनिंग सेरेमनी मध्येही 'मोंटेसेरा'सोबत तोच गायला, फक्त त्याच्या ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे..... ती जागा केवळ 'फ्रेडी'चीच होती......

Saturday, October 8, 2011

'मदन गंधर्व'

साधारण १९३७-३८ चा काळ. करमणूकीचं एक माध्यम म्हणून रेडिओ स्थिर झालाय. एका सकाळी दुकानातील रेडिओवर एक शास्त्रीय चीज लागते. एक किनारा आवाज ठुमरी अलगद उलगडू लागतो. गाणं ऐकू येताच भर बाजारातले व्यवहार अचानक ठप्प होतात. जो तो आपलं काम सोडून त्या आवाजाच्या दिशेने खेचला जातो. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न कोण ही नवी गायिका? इतर गायिकांसारखा हा काही अनुनासिक आवाज नाही, मग गातंय कोण? गाणं सर्वजण स्तब्ध होऊन ऐकतात. आणि गाणं संपल्यावर निवेदक नाव सांगतो, 'मास्टर मदन'. लोकांच्या चेह~यावर एकच प्रश्न, बाईचं नाव 'मदन' कसं? पुढे निवेदक लोकांना परिचय करून देतो दहा वर्षीय 'मास्टर मदन सिंह' या बालगायकाचा जी एका दर्जेदार गायकाच्या संगीत क्षितिजावरच्या आगमनाची नांदी असते. घरोघरी मास्टर मदनचीच चर्चा होऊ लागते.

मास्टर मदन, पंजाब राज्यातील, जालंधर जिल्ह्यातल्या सरदार अमरसिंह आणि पुरणदेवी यांचं धाकट अपत्य. २८ डिसेंबर १९२७चा याचा जन्म. अमरसिंह स्वत: चांगले गायक आणि तबला वादक होते. मास्टर मदन यांचा मोठा भाऊ, मास्टर मोहन, गाणं आणि व्हायलीन शिकत असे. त्या वेळेस छोटा मदन त्यांच्याच अवतीभवती असे. साडेतीन वर्षाचे असतानाच मास्टर मदन यांनी गायला सुरुवात केली. आसपासच्या गावात मास्टर मदन आणि मास्टर मोहनची जोडगोळी प्रसिद्ध झाली. पुढे त्यांनी देशभर संगीताचे कार्यक्रम करत दौरे केले. त्या काळात संस्थाने आणि मोठ्या शहरात गाण्याचे जलसे भरत. त्यांना मास्टर मदन यांनी हजेरी लावायला सुरुवात केली. अगदी लहान वयात त्यांचा आवाज, दमसाज, गायकी आणि संगीताची समज यांमुळे लवकरच त्यांना संगीत क्षेत्रात प्रसिद्धी मिळाली.

तो बोलपटांचा सुरुवातीचा काळ होता आणि चित्रपट संगीत प्रसिद्ध होऊ लागलेले. या चित्रपट संगीताचा राजा होते, कुंदनलाल सहगल. अख्खा भारत त्यांच्यावर फिदा होता पण तेच कुंदनलाल सहगल फिदा होते मास्टर मदन यांच्यावर. कलकत्त्याला आले की मास्टर मदन यांचा मुक्काम सहगलांच्या घरीच असायचा. अनेकदा ते मास्टर मदन यांच्याबरोबर गायन करायचे. त्यांचे गाण्याचे जलसे आयोजित करायचे, इतर ठिकाणच्या मास्टर मदनच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचे.

याच सुमारास रेडिओचे आगमन झाले आणि मास्टर मदन यांनी पहिलं गाणं तिथे गायलं आणि त्यांची लोकप्रियता भारत भरात पोहोचली. जलशांमध्ये मास्टर मदन यांना खूप मागणी येऊ लागली. त्यांचे दौरे ही वाढले. ते १४ वर्षाचे असताना कलकत्त्याला त्यांची एक मैफल झाली, त्यात त्यांनी पहिल्यांदा 'मोरी बिनती मानो कान्ह रे' ही एक अप्रतिम ठुमरी गायली. ती लोकांच्या इतकी पसंतीला पडली की त्यांना तिथल्या तिथे त्याकाळ चे रु. ५००/- नजर केले गेले आणि अनेक सुवर्ण पदके दिली गेली. (त्याकाळी सुवर्ण पदके खरोखर सोन्याचीच असायची.)

तिथून परतल्यावर त्यांनी दिल्ली रेडिओवर एक गझल रेकोर्ड केली. त्यानंतर त्यांना बारीक बारीक ताप येऊ लागला. औषधांनी गुण येईना म्हणून त्यांना हवापालटासाठी सिमल्याला आणले गेले. औषधोपचार चालू असतानाच त्यांचे कपाळ आणि सांधे यांच्यात चमक दिसू लागली आणि अचानक निदान झालं की त्यांना कुणीतरी पारा पाजला आहे. पा~याच्या विषाने त्यांचे शरीर पोखरले गेले. त्यांना स्वत:ला पूर्ण कल्पना आली आणि त्यांनी परिस्थितीला अत्यंत धीराने तोंड दिले. सर्व औषधोपचाराचा काहीही उपयोग न होता मास्टर मदन यांची प्राणज्योत ५ जून १९४२ रोजी वयाच्या १५व्या वर्षी मालवली. त्यांच्या मृत्यूचे गूढ, गूढच राहिले.
मला मास्टर मदन यांची माहिती एका मराठी पुस्तकात त्यांच्या बद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हा झाली. (पुस्तकाचं नाव आत्ता आठवत नाहीये, बहुदा अंबरीश मिश्रांचे 'शुभ्र काही जीवघेणे' असावं पण नक्की आठवल्यावर सांगेन.) त्यांच्याबद्दल वाचतानाच काळजात कुठेतरी जखम झाल्यासारखं वाटलं. ' यु ट्यूब'वर अचानक त्यांची गाणी ऐकायला मिळाली आणि ती जखम भळाभळा वाहू लागली. कुणाच्या इर्ष्येपायी आपण किती मोठ्या गायकाला मुकलोय याची जाणीव झाली. मास्टर मदन सामान्य मूल नव्हते, ते नक्कीच कुणी शापित गंधर्व आपल्या पृथ्वीतलावर जन्म घेऊन आलेले. त्या 'मदन गंधर्वाला' माझी ही छोटीशी शब्दरूप श्रद्धांजली.




मास्टर मदन यांचे सूर स्वर्गीय आहेतच पण मला एक गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते आणि ती म्हणजे त्यांची गायकीची समज. अगदी अलीकडे अलीकडे पर्यंत, मोठे मोठे शास्त्रीय गायक रेडिओवर गायचं टाळत. रेडिओवर शास्त्रीय गायानालाही वेळेचं बंधन होतं आणि हीच एक अडचण होती.

शास्त्रीय गायनाची परंपरा अशी की एक राग आळवला जाई, तो राग नि गाणं हळू हळू फुलवलं जाई, रागाचे निरनिराळे पदर गायक उलगडवून दाखवी आणि अखेर अखेर ताना, पलटे नि फिरक यांनी तास-तास भर चाललेल्या गायनाची सांगता होई. दरम्यानच्या काळात रसिक त्या गायलेल्या रागाचा, पदाचा आणि गायकाच्या कौशल्याचा पूर्ण आनद घेत असत. साधारण ७०-७५ सालापर्यंत शास्त्रीय गायन कमी वेळेत सादर होणेच अशक्य मानले जाई. कोणताही राग ३-४-५ मिनिटांच्या थोडक्या काळात सादर करण अशक्य मानलं जाई. अशा परिस्थितीत मास्टर मदन यांचं १९३५-४० सालातलं ३-४ मिनिटात रागाचं स्वरूप पूर्णत: उलगडून दाखवायचं कसब भन्नाट आहे. तेव्हढ्याच कालावधीत आलेल्या त्यांच्या ताना, पलटे, आवाजातली फिरक, कोवळ्या वयातला दम आणि तालावरचं प्रभुत्व खरोखर दृष्ट लागण्यासारखं आहे.

आज मास्टर मदन जिवंत असते तर..... हा प्रश्न अनेकदा मनात येतो. जर तर च्या गोष्टींना तसा काही फार अर्थ नसतो. पण एकच बाब तुम्हा सुहृदांसमोर ठेऊ इच्छितो.

साधारण याच काळात एक आणखी मुलगा संगीत क्षेत्रात प्रसिद्ध झाला. अशाच लहान वयात तोही संगीताच्या मैफिली गाजवू लागला. भारतभर त्याच्या संगीताचे कार्यक्रम होऊ लागले. त्याच्यावरही जीवाची संकट आली. पण एकच झालं की तो जगला. त्याने बनचुकेपणा केला नाही. सतत विद्यार्थी राहून शिकला, अनेकांना शिकवलं. गात राहिला, पुढे अनेक वर्ष. जग त्याला ओळखतं, "कुमार गंधर्व"म्हणून.....

कुणास ठावूक, कदाचित मास्टर मदन यांचंही असंच काही झालं असतं आणि संगीत क्षेत्रामध्ये या बहारदार कलाकाराने आणखी अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली असती.... (शेवटी पुन्हा यातही जर तर आहेच, नाही?)

Friday, October 7, 2011

'स्कॅटिंग'

सध्याच्या एकूण होपलेस परीस्थिताचा विचार केला तर फारच डीप्रेसिंग वाटू लागतं आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग माझ्या मते काही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हा आहे. अशी गोष्ट उत्तम संगीताशिवाय कोणती असू शकते? तेव्हा एका सुंदर संगीत प्रकारावर आपण आता प्रकाश पाडणार आहोत.

जॅझ संगीत हे अभिजात संगीत आहे. त्याचा उद्गम अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या आफ्रिकन मूळाच्या संगीतातून झालेला असला तरीही त्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याला परंपरा आहे. मानवी मनातील अनेक भाव या संगीतातून फार छान प्रकारे दर्शवले जातात.

याच जॅझ संगीताचा एक प्रकार आहे, स्कॅटिंग (Scatting). या संगीताच्या गायनामध्ये कोणत्याही प्रकारचे सार्थक शब्द नसतात तर केवळ काही निरर्थक शब्दांच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणा~या नादाने कर्णमधुर संगीत निर्मिती केली जाते. हे निरर्थक शब्दही काही वेळा वाद्यांच्या आवाजासारखे असतात.

या 'स्कॅटिंग'ला लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं 'लुई आर्मस्ट्रोन्ग' याला. १९२५ साली त्याचं गाणं आलं, "Heebie Jeebies". या गाण्याच्या काही ओळी अशा होत्या की त्यांना अर्थच नव्हता पण त्या निरर्थक शब्दांतून 'लुई'ने असं झकास संगीत निर्माण केलं की ही चाल देणा~या 'बोएड एटकिन्स'नेही याची कल्पना केली नसेल. यालाच नाव पडलं 'स्कॅटिंग'.

असं सांगतात की या "Heebie Jeebies" गाण्याच्या रेकोर्डिंगच्या दरम्यान 'लुई'च्या हातातून गाण्याचे कागद खाली पडले. चालू रेकोर्डिंग थांबवायला लागू नये म्हणून त्यावेळी त्याने मूळ शब्दांच्या ऐवजी हे निरर्थक शब्द वापरून वेळ मारून नेली आणि 'स्कॅटिंग'चा जन्म झाला. अशी ही एक किंवदन्ति सांगितली जात असली तरी त्यात तथ्य नाही असं संगीत तज्ञांच मत आहे.

तेव्हा तसं काही असो किंवा नसो पण 'लुई'ने एका वेड लावणा~या 'गान-स्टाईलला' जन्म दिलाय हे नक्की. एकदा इथे कान द्याच.....


'लुई' व्यतिरिक्त इतर अनेक गायक-संगीतकारांनी स्कॅटिंग' मध्ये मुसाफिरी केलेली आहे. त्यात मुख्य नाव आहे 'एला फित्झराल्ड'. १९४०-५० च्या सुमारास 'एला'नं स्कॅटिंग' आणखी उंचावर नेलं. जॅझ बरोबरच ब्लूज मुझिक प्रकारातही तिने 'स्कॅटिंग' गायला सुरुवात केली आणि ते ही खूप लोकप्रिय झालं.




असंच एक आणखी नाव आहे, 'बेटी कार्टर'. 'एला' प्रमाणेच ४० च्या दशकात प्रसिद्धी पावलेल्या बेटी'ने ही जाझ आणि 'स्कॅटिंग' प्रकारात खूप गाणी गायली आहेत. तिची 'स्कॅटिंग' प्रकारात इतकी लोकप्रियता होती की तिला 'बेटी बेबोप' असं टोपण नावच मिळालेलं. यातलं 'बेबोप' हे 'स्कॅटिंग' करताना ब~याचदा वापरली जाणारी निरर्थक अक्षरं आहेत.


१९९४ साली या 'स्कॅटिंग' ला एकदम नवसंजीवनी मिळाली. मुख्य प्रवाहापासून जरा दूर गेलेल्या या संगीत प्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या साली केलं 'स्कॅटमन जॉन'ने. १९४२ला जन्मलेला, जॅझ संगीतकार, प्रोफेशनल पियानो वादक असलेला आणि तोपर्यन्त फारसा कोणालाच माहित नसलेला, 'जॉन पौल लार्किंस' याला, त्याच्या 'स्कॅटिंग'ने आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवून दिली.

मूळ अमेरिकन असलेला 'जॉन', लहानपणापासून तोतरा होता. यामुळे त्याला शाळेत इतर मुलांकडून खूप त्रास आणि छळ सहन करावा लागला. या गोष्टीचा त्याच्या मानसिक जडणघडणीवर खूप वाईट परिणाम झाला. तो एकटा राहू लागला आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी त्याने जाझ संगीताचा मार्ग पत्करला. जाझ शिकत असताना त्याची 'लुई आर्मस्ट्राँग'च्या 'स्कॅटिंग'शी ओळख झाली आणि तो त्यावर फिदा झाला. वयाच्या १४व्या वर्षापासून तो स्वत: 'स्कॅटिंग' प्रकारात गाऊ लागला कारण या प्रकारात त्याचं तोतरेपण आड येत नव्हतं.

दरम्यान एकटेपणामुळे आणि डिप्रेशनमुळे पुढे त्याला दारूचे आणि अमली पदार्थांचे व्यसन लागले आणि तो त्याच्या अगदी आहारी गेला. १९८६ साली त्याचा जवळचा संगीतकार मित्र 'जो फारेल' मरण पावल्यावर 'जॉन'ने आपल्या पत्नीच्या, 'ज्युडी'च्या मदतीने स्वत:ला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली.

साधारण ९० सालच्या सुरुवातीला तो आपलं जॅझ संगीतातील करीअर मार्गावर आणण्याच्या प्रयत्नात बर्लिन इथं आला. इथे त्याने आपल्या जॅझ संगीताला स्वत:च्या गाण्याची जोड दिली आणि 'स्कॅटिंग'च्या माध्यमातून त्याचा आणि त्याच्या करीअरचा जणू पुनर्जन्म झाला. इतर वेळी बोलताना त्याचं तोतरेपण जाणावे पण 'स्कॅटिंग'च्या दरम्यान तसं काहीच जाणवत नसल्याने त्याला यात तुफान लोकप्रियता मिळाली.

'स्कॅटिंग' प्रकाराने तोतरेपणावर उपचार केला जातो आणि अशा मुलांचा 'जॉन' अगदी रोल मोडेल बनून गेला. अमेरिकन 'स्पीच लँग्वेज हिअरिंग असोसिएशन'ने याबद्दल 'जॉन लार्किंस'चा 'एनी ग्लेन पुरस्कार' आणि National Stuttering Association Hall of Fame पुरस्कार देऊन गौरव केला.

१९९९ साली फुप्फुसाच्या कर्करोगाने 'स्कॅटमन जॉन लार्किंस'ला देवाज्ञा झाली.

'जॉन'चे 'स्कॅटिंग' ऐकाच......


'स्कॅटमन जॉन लार्किंस'चा दुसरा अल्बम, 'एव्हरीबडी जॅम' मधलं आणखी एक छान गाणं......





Tuesday, October 4, 2011

'द किंग'

१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत. स्वत: कोणत्याही प्रकारचं औपचारीक सांगीतिक शिक्षण न घेतलेल्या या मुलाला मात्र संगीताने पार नादावून टाकलं होतं.

कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करणा~या याने त्या धुंधीतच एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळीही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं.

हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना. रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं.
गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama".


'एल्व्हिस'ने आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे. अशा गाण्यांपैकी काहींची थोडी माहिती घेण्यात जराही हरकत नाही.

मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा. त्याची 'लार्जर द्यान लाईफ' प्रतिमा होण्यामागे त्याचा पर्फोर्मंस आणि ही अशी गाणीच कारणीभूत असावी. व्यक्तिश: मलाही त्याचं हे गाणं खूप आवडतं.


'एल्विस'चं आणखी एक भन्नाट गाणं आहे, "Jailhouse Rock". 'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'एल्विस'च्या या सादरीकरणाच्या चित्रिकरणातून भारतातील कोण या शैलीने प्रभावित झालेलं आहे हे देखील लक्षात येतं. (आता कसं, शैलीने प्रभावित होणं इ. इ. हे वाचायलाही बरं वाटत, उगाच नक्कल वगैरे का म्हणा...?)


'एल्व्हिस'चं महत्त्व यातही आहे की शक्य असूनही त्याने आपल्या लोकप्रियतेचा वाईट अर्थाने फायदा करुन घेतला नाही. ६०च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता. आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं.

लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस'ने आपलं करीअर पुन्हा सुरु केलं. संगीत, काव्य याबरोबरच त्याने अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्याची लोकप्रियता कैक पटीने वाढली. ६०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७०च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. या सगळ्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. त्याला अमली पदार्थांच व्यसन जडलं, त्याचा विवाह-विच्छेद झाला, शरीर व्याधींनी पोखरून निघालं.

या पार्श्वभूमीवर १६ ऑगस्ट १९७७ रोजी दुपारी अमेरिकन संगीताचा चेहरा-मोहरा बदलणा~या 'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची प्राणज्योत मालवली. 'रॉक एन रोल'च्या सम्राटाला हा माझा शाब्दिक मुजरा!



 

Monday, October 3, 2011

लुई आर्मस्ट्राँग

संगीताला कोणत्याही राष्ट्रीय सीमा नसतात आणि ते कोणत्याही एका वंशाची जहागीर नाही. ध्वनीमध्ये 'तो' भाव आला की त्याचं संगीत बनतं आणि कानाला गोड लागणारं गीत-संगीत स्थळ-काळाच्या पलीकडे जाऊन एक फार प्रसन्न भावना मनात उत्पन्न करतं....

हे सगळ आठवलं "लुई आर्मस्ट्राँग" च्या गाण्यावरून....


तीन-चारशे वर्षांपूर्वी, अमेरिकेमध्ये गुलामगिरी प्रथा सर्वमान्य असताना, ब्रिटिशांकडून मोठ्या प्रमाणात आफ्रिकेतून कृष्णवर्णीयांना तिथे गुलाम म्हणून विकण्याचा व्यवसाय जोरात होता. लाखो आफ्रिकन गुलाम म्हणून अमेरिकेत वसले आणि दिवसाच्या १८-२० तासांच्या काबाडकष्टाच्या आयुष्याला सामोरे गेले. अशा आयुष्यात 'स्ट्रेस बस्टर' म्हणून त्यांनी त्यांच्या मूळ आफ्रिकन स्रोताच्या संगीताचा वापर केला. आपल्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खे त्यांनी या संगीताच्या मार्गाने व्यक्त करण्यास सुरुवात केली.
पुढे साठच्या दशकात अमेरिकेत नि युरोपात प्रस्थापितांच्या विरोधात तरुणांची लाट उसळली. त्या काऊन्टर कल्चर वा हिप्पी संस्कृतीतील तरुणांच्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी याच प्रकारच्या संगीताचा मार्ग चोखाळला गेला.

याच आफ्रिकन स्रोत असलेल्या संगीताला नाव मिळालं "ब्लूज म्युझिक".

"लुई आर्मस्ट्राँग" हे जाझ आणि ब्लूज संगीतामधलं एक अग्रणी नाव! गायक संगीतकार आणि वादक असलेल्या लुईचा वैशिष्ठ्य पूर्ण आवाज जेव्हा गाण्यातला गोडवा व्यक्त करू लागतो तेव्हा ब्लूजची शक्ती मूर्तिमंतरीत्या आपल्या पुढे उभी राहाते.


जाझ संगीत हे अभिजात संगीत आहे. त्याचा उद्गमही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या आफ्रिकन मूळाच्या संगीतातून झालेला असला तरीही त्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याला परंपरा आहे. मानवी मनातील अनेक भाव या संगीतातून फार छान प्रकारे दर्शवले जातात. याच जाझ संगीताचा एक प्रकार आहे, स्कॅटिंग (Scatting). या संगीताच्या गायनामध्ये कोणत्याही प्रकारचे सार्थक शब्द नसतात तर केवळ काही निरर्थक शब्दांच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणा~या नादाने कर्णमधुर संगीत निर्मिती केली जाते. हे निरर्थक शब्दही काही वाद्यांच्या आवाजासारखे असतात.

या 'स्कॅटिंग'लाही लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं 'लुई आर्मस्ट्राँग' याला. १९२५ साली त्याचं गाणं आलं, "Heebie Jeebies." या गाण्याच्या ओळी अशा काही होत्या की त्यांना काहीच अर्थ नव्हता पण त्या निरर्थक शब्दांतून 'लुई'ने असं काही झकास संगीत निर्माण केलं की ही चाल देणा~या 'बोएड एटकिन्स'नेही याची कल्पना केली नसेल.


'लुई आर्मस्ट्राँग'चा जन्म १९०१ साली न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना या प्रामुख्याने आफ्रिकन-अमेरिकन लोकवस्तीच्या शहरात झाला. लुईला संयुक्त कुटुंबांचं भाग्य लाभलंच नाही. लहानपणापासून कष्टाच्या जीवनाला सरावलेल्या लुईला पैशांसाठी अनेक प्रकारची कामं करावी लागली. अकराव्या वर्षीच त्याने शाळेला राम राम ठोकला आणि सुरुवातीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पेपर लाईन टाकणे आणि रस्त्यावर नाच-गाणी करून पैसे मिळवणे असे उद्योग त्याने करून बघितले, पण ते पुरेसे नव्हते. या काळात त्याला 'न्यू ऑर्लिन्स'च्या 'कार्नोव्स्की' या स्थलांतरीत लिथुअनियन श्वेतवर्णीय ज्यू कुटुंबाने खूप मदत केली. रस्त्यावर राहून तिथल्या वातावरणात बिघडण्याची शक्यता असलेल्या या बापाविना पोर लुईला कार्नोव्स्की कुटुंबाने आपल्यातच सामावून घेतलं. त्यांच्या भंगाराच्या व्यवसायात लुई मदत करू लागला आणि जीवनात प्रथमच त्याला एक कौटुंबिक आयुष्य लाभलं. इथे मिळालेल्या प्रेमाला आणि आपुलकीला लुई आयुष्यात कधी विसरला नाही. त्या कृतज्ञतेपायी पुढे आयुष्यभर 'स्टार ऑफ डेव्हिड'चे लॉकेट त्याने परिधान केले. या आठवणी लुईने "Louis Armstrong + the Jewish Family in New Orleans, La., the Year of 1907" या त्याच्या चरित्रात लिहिल्या आहेत. इथेच त्याला श्वेत वर्णीयांमध्येही इतर ज्यू इ. धर्मीय श्वेत वर्णीयांविषयी असलेल्या वांशिक-धार्मिक भेदाचा प्रत्यय आला. त्यातूनच पुढे तो मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या खंद्या पुरस्कर्त्यांपैकी एक बनला.

लुईने आपल्या सांगीतिक शिक्षणाची सुरुवात 'पीटर डेव्हीस' यांच्याकडून केली. अपराधासाठी सुधारगृहात डांबलेल्या मुलांना ते संगीत शिकवायचे आणि लुईही तेव्हा आपल्या सावत्र वडिलांच्या पिस्तुलीतून हवेत फैरी झाडल्याच्या आरोपावरून तिथेच काही दिवस मुक्कामाला होता. संगीताची आवड असलेल्या लुईला यामुळे स्वत:ला व्यक्त करायचा एक मार्ग गवसला आणि त्याने त्या मार्गावर वाटचालीला आरंभ केला. इतर कलाकारांना बघत बघत लुई आपलं वादन, गायन आणि संगीत फुलवत गेला. दरम्यान प्रसिद्ध जाझ म्युझिशियन आणि कोर्नेट वादक 'जो किंग ऑलिव्हर'ने लुईला आपल्या पंखाखाली घेतलं. त्यांच्याकडे लुईने कोर्नेट वादनावर प्रयत्नपूर्वक इतकं कौशल्य मिळवलं की जेव्हा 'जो किंग'नं करिअरसाठी लुइझियाना सोडलं तेव्हा त्याच्या जागी वादक म्हणून लुईचीच वर्णी लागली.

२०व्या दशकापासून लुई निरनिराळ्या जाझ संगीत मंडळींबरोबर कोर्नेट वादनाची साथ करू लागला.त्याच्यावर 'जो किंग'च्या वादनाचाही खूप प्रभाव होता. पण लुईची पत्नी लिल हार्डेन हिने त्याला 'जो'च्या प्रभावातून बाहेर पडायला आणि स्वत:ची शैली विकसित करायला भाग पाडलं. त्यामुळे लुई पुढे ट्रंपेट, क्लेरिओनेट अशी वाद्ये हाताळू लागलाच पण त्याची स्वत:ची एक वेगळीच गायनाची शैलीही त्याने बनवली जी पुढे अत्यंत लोकप्रिय झाली.

लुईच्या संगीताला त्याच्या गायनाची जोड मिळाल्यावर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. त्याचे सांगीतिक दौरे वाढले. समाजातील उच्चभ्रू लोकांमध्ये त्याला मान मिळू लागला जो त्याकाळात कृष्णवर्णीयांना मिळणे अगदी दुरास्पद होते. यामुळे अनेक कृष्णवर्णी कलाकार मत्सरग्रस्त झाले पण लुईने आपली सामाजिक बांधिलकी कधीच सोडली नाही. आपल्या संगीताच्या माध्यमातून त्याने नेहमीच वांशिक भेदाला विरोध केला. आपली वेगळी चूल न बनवता गौरवर्णीयांच्या बरोबरीने आपलं संगीत सादर करून हा भेद मिटवण्याचाच त्याने प्रयत्न केला.

अत्यंत हाल-अपेष्टा भोगून स्वकर्तृत्त्वाने मोठ्या झालेल्या लुईचा गमत्या स्वभाव अगदी शेवटपर्यंत टिकला. त्याच्या आजूबाजूला तो सतत हास्याची कारंजी उडवायचा आणि वातावरण प्रफुल्लीत ठेवायचा. तो भरपूर गोष्टी वेल्हाळ होता. स्वत: विषयी सुद्धा त्याने अनेक प्रसंग गोष्टींच्या माध्यमातून सांगितले आहेत.

संगीत क्षेत्रात लुई 'पॉप्स' म्हणून ओळखला जायचा पण त्याबरोबरच त्याला 'सॅचमो' या टोपण नावानेही लोक हाक मारायचे. या नावामागचं कारुण्य मात्र लोकांना माहीत नव्हतं. असं लुईच सांगायचा की लहान लुई जेव्हा रस्त्यावर नाचगाणी करून कुटुंबाला हातभार लावायचा तेव्हा लोकांनी त्याच्याकडे फेकलेली नाणी दुस~या टग्या मुलांनी नेऊ नयेत म्हणून तो ती नाणी तोंडात ठेऊन त्याचा सॅचेल म्हणजे पिशवी (Satchel) सारखा वापर करायचा आणि म्हणूनच त्याला Satchel-mouth किंवा Satchmo हे नाव मिळालं होतं.

जवळ जवळ अर्ध्या दशकाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत असणा~या लुईच्या कारकिर्दीत त्याच्या अनेक संगीतकार-गायकांशी जोड्या जमल्या. त्यापैकी त्याची गायिका एला फित्झराल्ड आणि श्वेतवर्णीय गायक बिंग क्रॉस्बी यांच्या बरोबरची जोडी खूप लोकप्रिय झाली. लुई बरोबर फ्रॅन्क सिनात्रा आणि डॅनी के यांच्या जोड्यादेखील खूप गाजल्या.

यांची एकत्र गाणी ऐकण म्हणजे पर्वणीच असायची.

लुई आणि एला यांच्या गाण्यांची झलक.....

http://www.youtube.com/watch?v=io0uqrp9dco
http://www.youtube.com/watch?v=GeisCvjwBMo&feature=related
http://www.youtube.com/watch?v=ma91kie8G3A&feature=related

लुई आणि बिंग यांच्या गाण्यांची झलक....

http://www.youtube.com/watch?v=dC3VTBG0tRc
http://www.youtube.com/watch?v=BwwdKrGGRlI&feature=related

लुई आणि फ्रॅन्क यांच्या गाण्याची झलक.....

http://www.youtube.com/watch?v=A9k4uKcuLGk

लुई नि डॅनी के यांची धमाल.....

http://www.youtube.com/watch?v=jm6ktYq0Yxk

१९६४ साली लुईने इतिहासच घडवला. त्याआधीच्या तीनही वर्षी बिलबोर्ड काऊन्टडाउन मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या 'बीटल्स'ना त्यांच्या त्या स्थानावरून पदच्युत करून लुईच्या "Hello, Dolly!" या गाण्याने प्रथम क्रमांक पटकावला. मूळचे 'करोल चेनिंग'चे हे गाणे लुईने आपल्या जबरदस्त ढंगात असे पेश केले की त्याने लोकप्रियतेचा कळसच गाठला. हे गाणे २००१ मध्ये 'ग्रॅमी हॉल ओफ फेम' मध्ये अंतर्भूत केलं गेलं.

लुईचे "Hello, Dolly!" इथे बघा नि ऐका......


'लुई आर्मस्ट्राँग' १९७१ साली क्वीन्स, न्यू यॉर्क इथं हृदय विकाराच्या धक्क्याने वयाच्या सत्तराव्या वर्षी वारला. अत्यंत गरीबीत जन्माला आलेला आणि अत्यंत श्रीमंतीत मृत्यू पावलेल्या लुईने त्याच्या संपूर्ण आयुष्यादरम्यान कुणालाही दुखावलं नाही तर त्यांच्या हृदयात आनंदाच्या चांदण्याचीच उधळण केली.

'जाझ' नावाच्या लघुपटाचा निर्माता 'केन बर्न्स' याने एकाच वाक्यात लुईची महती वर्णिली आहे - "Armstrong is to music what Einstein is to physics and the Wright Brothers are to travel." ती लुईच्या संगीताचा आणि आयुष्याचा विचार करता अगदी यथार्थ म्हणता येईल.