Wednesday, December 11, 2013

गीतगुंजन - २६ -> Locomotive Breath

'इयन अ‍ॅन्डरसन' बद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल वाटायचं. आज वयाच्या सहासष्टीत असलेल्या इयनला मी पहिल्यांदा पाहिलं, ऐकलं ऐंशीच्या दशकात. १९७२ पासून भारतात नियमितपणे कार्यक्रम करणार्‍या 'जेथ्रो टल' या प्रोग्रेसिव्ह-हार्ड रॉक ग्रूपचा निमंत्रक आणि म्होरक्या गायक म्हणून इयन प्रसिद्ध आहे. मला पाश्चात्य संगीतामधलं ओ की ठो कळत नसताना, (अर्थात आताही मला काही फार कळतंय, अशातला भाग नाही पण तरीही) मला त्याच्या शैलीबद्दल अगदी अप्रूप वाटायचं. त्याची साधी गाणीही ऐकायला काहीशी वेगळीच वाटायची, ती त्याच्या त्या शैलीमुळेच. असं काय वेगळं होतं त्यात?


जन्माने स्कॉटीश असलेल्या इयनला संगीतात विशेष रस होता. पारंपारिक शिक्षणाची नावड नसली तर स्वभाव हूड आणि टग्या असल्याने तिथे त्याचं मन रमलं नाही. पुढे फाईन आर्ट्स शिकलेल्या इयनचा हात निरनिराळ्या वाद्यांना सफाईने हाताळायचा. त्यावेळी त्याचा कल ब्लूज् संगीताकडे अधिक होता आणि त्यामुळे हार्मोनिका, गिटार आणि ड्रम्स ही त्याची आवडती वाद्य होती. असं असूनही आपण गिटार, 'एरिक क्लॅप्टन'इतकी चांगली वाजवू शकत नाही, असा स्वतःचा ग्रह करून घेऊन इयननं स्वतःच लक्ष अचानक ब्लूज् आणि रॉक संगीतात दुर्मिळ असणार्‍या वेस्टर्न कॉन्सर्ट फ्लूट अर्थात बासरीकडे वळवलं. तेव्हापासून इयन आणि त्याची बासरी, जेथ्रो टलचा अविभाज्य भाग झाली. लाईव कॉन्सर्ट मध्ये जेथ्रो टलचा म्होरक्या गायक म्हणून गाताना, गाण्यादरम्यान बासरीवर सुरावटी काढणारा इयन स्वतःची वेगळीच शैली प्रस्तुत करण्यात सफल झाला आणि याच शैलीतील संगीतामुळे मी जेथ्रो टलच्या प्रोग्रेसिव्ह रॉक संगीताकडे आणि पर्यायाने इयन अ‍ॅन्डरसनकडे ओढला गेलो.

जेथ्रो टलचं, इयन अ‍ॅन्डरसनने लिहिलेलं आणि स्वतःच्या शैलीत सादर केलेलं असं एक गाणं आजच्या गीतगुंजनचं २१वं पुष्प म्हणून माझ्या मित्रांसमोर सादर करतोय. हे गाणं आहे - Locomotive Breath.
जेथ्रो टलच्या १९७१ सालच्या प्रसिद्ध 'अ‍ॅक्वालंग' नावाच्या अल्बममधलं हे गाणं आहे. या गाण्याची खासियत अशी की मूळात हे स्टुडिओतलं गाणं आहे. स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं पण जेथ्रो टलच्या लाईव कॉन्सर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर फर्माईश केलं जाणारं हे गाणं, टप्प्याटप्प्याने बनलंय. गीत-संगीत आणि गायन इयनचं आहे आणि त्यातली बासरी, बॅस ड्रम, सिंबल, अ‍ॅकॉस्टिक आणि इलेक्ट्रिक गिटार इयननेच वाजवलेत. सुरूवातीला झक्कपैकी वाजणारा ब्लूज् पियानो जॉन इवानचा आहे, त्याला क्लाईव बंकरचे ड्रम्स, मार्टीन बॅरेची इलेक्ट्रिक गिटार तर जेफ्री हॅमोण्डची बॅस गिटार यांनी साथ दिलीय; मात्र हे बाकी ट्रॅक ओव्हरडबिंग करून गाण्यात टाकले गेले आहेत. नीट ऐकलं तर वाफेच्या इंजिनाचा इफेक्ट वेळोवेळी देणारी, बासरी, अ‍ॅकोस्टिक गिटार आणि बॅस ड्रम्स त्याची जाणीव करून देतात.

इयनने त्याच्या मुलाखतींमध्ये Locomotive Breath हे मानवी जीवनातल्या ढासळत्या सामाजिक मूल्यांवर भाष्य करणारं गाणं असल्याचं म्हण्टलंय. त्यातील शब्द तसं ध्वनितही करतात पण माझं मन त्यातल्या सांगीतिक चमत्कृतीकडे जास्त आकर्षित होतं आणि मग इयनची गायकी, त्याचं बासरीवादन आणि प्रोग्रेसिव रॉकचं संगीत, एक खुमासदार रसायन बनतं.

तेव्हा आनंद घ्या Locomotive Breath या गाण्याचा.



Locomotive Breath गीत -
In the shuffling madness
Of the locomotive breath,
Runs the all-time loser,
Headlong to his death.
He feels the piston scraping --
Steam breaking on his brow --
Old Charlie stole the handle and
The train won't stop going --
No way to slow down.
He sees his children jumping off
At the stations -- one by one.
His woman and his best friend --
In bed and having fun.
He's crawling down the corridor
On his hands and knees --
Old Charlie stole the handle and
The train won't stop going --
No way to slow down.
He hears the silence howling --
Catches angels as they fall.
And the all-time winner
Has got him by the balls.
He picks up Gideon's Bible --
Open at page one --
God stole the handle and
The train won't stop going --
No way to slow down.

छायाचित्र आंतरजालावरून आणि गाण्याचा विडिओ यू ट्यूब वरून साभार.