Monday, July 16, 2012

एक सुखद फ्युजन

काही गोष्टी अपघाताने घडतात. अशा अपघाताचा परिणाम बघता, ते वेळोवेळी का होत नाहीत याबद्दल खट्टू व्हायला होतं. अर्थात ते पैशापासरी न होणं हेच त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारं असतं, नाही का?

असे हे उपरोल्लेखित अपघात आपल्या संगीत सृष्टीत ठराविक काळाने पुन्हा पुन्हा घडत असतात आणि त्यामुळे ते आपलं जीवन आणखी सुसह्य करून सोडतात असं आपलं मला वाटतं. असाच एक अपघात १९९२ मध्ये कधीतरी घडला आणि आपलं सांगीतिक विश्व समृद्ध करता झाला.

जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत देणारा संगीत दिग्दर्शक त्या वेळेला रेकॉर्डिंग रूममध्ये जिंगल्सचे शब्द येण्याची वाट बघत होता. त्याची चाल तयार होती, वेगवेगळ्या वाद्यांची संरचना आवश्यकतेप्रमाणे करून झालेली, वादकांनी आपापल्या जागा धरलेल्या, त्याचा गायक येऊन तयार होऊन रेकॉर्डिंगसाठी उभा होता आणि रेकॉर्डिस्ट्स नि साऊण्ड इंजिनीयर्स त्यांची त्यांची कामं पूर्ण करून रेकॉर्डिंगच्या तयारीत होते, गायकाबरोबर गाण्याची धुन वाजवून रियाजही करून झालेला पण जे गायचंय त्या गाण्याचाच पत्ता नव्हता. जसा तो संगीत दिग्दर्शक नावाजलेला होता तसाच त्याचा गायकही प्रथितयश होता. रेकॉर्डिंग ठरवलेला दिवस नुसताच ढळून जात होता आणि संगीत दिग्दर्शकाचा संयमही. रेकॉर्ड रूम मधून एका अस्वस्थतेत संगीत दिग्दर्शक बाहेर पडला आणि आपल्या वाद्य समूहाकडे जाऊन त्याने गिटार हातात घेतली. त्याला काय सुचलं कुणास ठाऊक, त्याने त्यातून सुरावट वाजवायला सुरूवात केली. वाद्यवृन्दातील वादकांना त्याच्या या अस्वस्थावस्थेतल्या वागण्याची सवयच होती. त्यांनी अहेतुकपणे त्याच्या सुरावटीला साथ देणं सुरू केलं. तो संगीत दिग्दर्शक नि त्याच्या वादकांच्या त्या सुरावटीने उपस्थित गायकाला काही वेगळीच जाणीव झाली आणि नकळतच त्याच्या तोंडून त्या संध्याकाळच्या वेळेचा परिणाम म्हणून म्हणा किंवा इतर काही पण मारव्याचा आलाप निघाला. सुरावट पुढे सरकता सरकता गायकाने निरनिराळ्या पद्धतीने त्यात मारव्याच्या सुरावटी गुंफल्या आणि या सगळ्याची परिणिती एका अत्यंत श्रवणीय फ्युजन संगीतानुभवामध्ये झाली. यामध्ये पौर्वात्य नि पाश्चात्य संगीत प्रकारांचं एक वेगळंच मिश्रण तयार झालं. ते तसं पूर्वीच्या रविशंकर-झाकिर-मॅक्लॉग्लीनच्या प्रसिद्ध 'शक्ती'पेक्षा जरा निराळ्याच प्रकारचं होतं पण होतं फ्युजनच. दोन्ही संगीत प्रकार आपापलं स्वतंत्र अस्तित्त्व राखून खुमारी वाढवत होते.

संगीत रंगात येऊ लागताच रेकॉर्डिस्ट्स ते तुकडे ध्वनिमुद्रित करू लागले. किती तरी वेळ हे जॅम सेशन सुरू होतं, किंबहुना ते, जिंगल्सचे शब्द आल्यावरच थांबलं पण कुणीच कंटाळलेलं नव्हतं. संगीत क्षेत्रातल्या एका अपघाताची नोंद तेव्हा घेतली गेली हे निश्चित.

या सत्य घटनेमधला संगीत दिग्दर्शक होता लेस्ली लुईस उर्फ लेस् आणि गायक होता हरिहरन्. जिंगल्सना संगीत देणारा लेस् पाश्चात्य संगीतातला जाणकार नि स्वतः गायक. हरिहरन् कर्नाटक आणि हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतज्ञ नि आपल्या मखमली आवाजासाठी प्रसिद्ध. वरच्या अपघाताचा परिणाम म्हणून ऑफिशियली १९९६ साली निर्माण झाले, 'कॉलोनियल कझिन्स' आणि त्यांचा याच नावाचा पहिला अल्बम.




लेस् आणि हरिहरन् आपापल्या संगीताशी प्रामाणिक राहून नि एकमेकांवर कुरघोडी न करता जे सादर करतात त्याला खरोखरच तोड नाही असं वाटतं. पुढे त्यांनी आणखी दोन अल्बम्स काढले (द वे वुई डू इट आणि आत्मा) शिवाय दोन तमिळ सिनेमांना संगीतही दिलंय.

त्यांच्या अल्बम्स मधली तीन गाणी त्यांची विस्तृत रेन्ज दर्शवण्यासाठी पुरेशी ठरतील याची खात्री आहे.

आनंद घ्या.
पहिलं, कृष्णा

दुसरं, सा नी ध प

तिसरं, ओ! ओ! काय झालं ( या गाण्यातली इव्हा ग्रोवर काळजाचं पार पाणी पाणी करते राव, नै?) ;-)