Thursday, December 8, 2011

पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अ‍ॅबा

सत्तर चं दशक हे पूर्णपणे 'डिस्को'चं दशक होतं. सुरुवात 'बीगीज'ने केलेलीच होती पण त्याला कळस चढवण्यासाठी हातभार लागला 'ABBA'चा.

'अ‍ॅनी-फ्रीड' तथा 'फ्रीडा लिंग्स्टाड', 'बियॉर्न उल्वैस', 'बेनी एन्डरसन' आणि 'अ‍ॅग्नेथा फेल्टस्कुग' या चार जणांच्या नावाच्या आद्याक्षरानी बनवलेला त्यांचा ग्रूप 'ABBA'. यातील बियॉर्न आणि अ‍ॅग्नेथा आधीच एकमेकांच्या लग्नबंधनात अडकलेले तर बेनी आणि फ्रीडा लिव-इन कपल होते (यथावकाश त्यांनीही एकमेकांशी लग्न केलं.)




घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने - बियॉर्न, बेनी, अ‍ॅन-फ्रीड आणि अ‍ॅग्नेथा.


१९७२ ते १९८३ या काळात अनेक अप्रतिम गाणी यांनी दिली. हा ग्रूप मूळचा स्वीडिश. स्वीडन मध्ये लोकप्रिय झाल्यावर 'बियॉर्न' आणि 'बेनी'ने इंग्लिश गाणी लिहून सादर करण्याला सुरुवात केली. गायिका होत्या अ‍ॅग्नेथा आणि फ्रीडा. साधे साधे कोणालाही समजतील असे इंग्लिश शब्द, साधेसे विचार आणि नृत्योन्मुख करणारं डिस्को म्युझिक यांच्या बळावर 'ABBA'ने संगीत जगतावर राज्य केलं.

१९७५ साली त्यांच्या एका गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला. एकाच वेळी जगातील १३ देशांमध्ये ते १ल्या क्रमांकावर होते, इतर अनेक देशांतील चार्टस मध्ये ते पहिल्या १० मध्ये होते.

'ABBA'ची गायिका अ‍ॅग्नेथा एका कार्यक्रमात म्हणाली होती की संगीताच्या दुनियेत कोणतं गाणं हिट होईल आणि कोणतं नाही हे नक्की कधीच सांगता येत नाही पण याला अपवाद फक्त या एका गाण्याचा आहे कारण हे जेव्हा बनत होतं, तेव्हापासूनच आम्हाला समजत होतं की गाणं प्रचंड म्हणजे प्रचंड हिट होणार आहे.
तर असं हे गाणं होतं, "Dancing Queen".

तेव्हा त्या जबरदस्त गाण्याचा आपणही आनंद घेऊ या.......



'ABBA' ची गाणी खूप गाजली. 'बियॉर्न' आणि 'बेनी'चे कॉनसेप्टस, शब्द आणि चाली, अ‍ॅग्नेथा आणि फ्रीडा यांचं सहज सुंदर गायन यांद्वारे एक power packed रसायन बनायचं. त्याची धुंदीच चढायची जणू! आता हे पुढील गाणं त्याचाच नमुना आहे.

प्रेमात पडलेली स्त्री आपल्या प्रियकराचे सर्व अपराध पोटात घालते, त्याला क्षमा करते. का? कारण तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय इतर कुणाचा ती विचारच करू शकत नाही. बस्स! या एका सिद्धांतावर बनलंय 'ABBA'चं गाणं "Mama Mia".

म्हटलं तर 'ABBA'चं सगळच स्टायलिश होतं, म्युझिक, गाणी, पर्फोर्मंस आणि अगदी त्यांचे कपडेसुद्धा. आपल्या बोलीवूडी हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांचे प्रसंग- वेशभूषा त्यांच्या फॅशन वरून उचलल्याचं स्पष्ट दिसतं. आता हे गाणं ऐकल्यावर काहींना गाण्याच्या चालीही उचलल्याचं आढळलं तर त्या 'इन्स्पायर्ड' होत्या असा आपण युक्तिवाद करून टाकू या.... काय?

आनंद घ्या 'ABBA'च्या "Mama Mia"चा......




'ABBA'ची गायिका 'फ्रीडा' हिच्यासाठी 'ABBA'चे मेंबर 'बियॉर्न' आणि 'बेनी' यांनी लिहिलेले गाणे "Fernando". हे तिच्या पहिल्या स्वीडिश अल्बममध्ये वापरले गेले आणि तुफान हिट झाले.

त्यामुळे लगेचच बियॉर्न आणि बेनी यांनी ते 'इंग्लिश'मध्ये लिहून 'ABBA'साठी रेकोर्ड करायची योजना आखली. त्याप्रमाणे 'इंग्लिश'मध्ये हे गाणं १९७५मध्ये 'सिंगल' या स्वरूपात प्रकाशित झालं आणि त्यांच्या जगभरात लोकप्रिय गाण्यांच्या यादीत एकाची भर पडली.

या गाण्यासाठी फ्रीडाचा आवाज छान लागलेलाच आहे पण त्यातूनही अ‍ॅग्नेथाचा खर्ज ही भारी लागलेला आहे.
एका वेगळ्या धर्तीच्या गाण्यासाठी जरूर ऐका..... "Fernando"


सत्तरच्या दशकात युरोपात आंतर-युरोप गाण्याच्या स्पर्धा होत असत. याला 'युरोविजन' असं नाव होतं. यामध्ये युरोपातले देश आपापल्या भाषांतील गाणी सादर करून सामील व्हायचे. यात यशस्वी झालेली गाणी पुढे युरोपात खूपच प्रसिद्ध व्हायची.

'ABBA'चे मेम्बर्स 'ABBA' बनण्यापूर्वीपासूनच संगीत क्षेत्रात प्रसिद्धी पावलेले होते आणि १९७३ साली ते या युरोविजन स्पर्धेत तिस~या क्रमांकावर राहिले होते. १९७४ साली त्यांनी "ABBA'च्या नावे प्रवेशिका धाडली आणि गाणं पाठवलं, "Waterloo".

या गाण्याची पार्श्वभूमी फारच मस्त आहे. ऐतिहासिकदृष्ट्या नेपोलियनला पराभवाचा पहिला झटका बसला 'वाटेर्लू' च्या लढाईत. (त्याने आपला पूर्ण पराभव त्यानंतर ४ महिन्यांनी 'रोशफोर्ट'च्या लढाईच्या वेळी मान्य केला असला तरी) या गाण्यात 'वाटेर्लू'चाच संदर्भ घेतलेला आहे. प्रेमाच्या आणाभाका घेण्यात उत्सुक असलेल्या एका मुलीचे मनोगत 'ABBA' यात व्यक्त करत आहेत. ती मुलगी या पूर्ण प्रक्रियेला नेपोलियनच्या वाटेर्लू मधल्या सरेंडरच्या प्रक्रियेशी बद्ध करतेय. त्याच्या सरेंडर प्रमाणेच मी प्रेमात माझ्या प्रियकराला सरेंडर (समर्पित) करत आहे. ती पुढे असं ही म्हणते की यात माझा नेपोलियन सारखाच पराजय झालाय पण माझ्या या पराभवातच माझा विजय लपलेला आहे.

हे गाणं १९७४च्या युरोविजन मध्ये 'ABBA'ने जबरदस्त प्रस्तुत केलं. परभाषेतील असूनही अग्नेथा आणि फ्रीडा यांनी हे गाणं फारच छान गायलं. त्यांची वेशभूषा सोल्लिड होती. विडिओची फ्रेम अन फ्रेम झकास बनलेली. त्यावर कहर म्हणजे त्या काळात युरोविजन मध्ये न ऐकू येणारे डिस्को बीट्स. हे गाणं युरोविजनचं विजेता गाणं ठरलंच पण एरवी जी युरोविजन विजेती गाणी युरोपाबाहेर कुठेच लोकप्रिय होत नव्हती त्याला छेद देऊन जगभरात लोकप्रिय झालं.

हे तुफान गाणं ऐकायलाच हवंय......


'ABBA' चं एक गाणं खूपच स्पेशल म्हणावं लागेल.

१९७९ मध्ये 'युनिसेफ'च्या 'म्युझिक फोर युनिसेफ कॉनसर्ट' या चेरीटी कार्यक्रमात या गाण्याचा अंतर्भाव करण्यात आला आणि याचं प्रसारण 'युएन जनरल असेम्ब्ली'मधून जगभरात करण्यात आलं. या कार्यक्रमामुळे 'ABBA'ने या गाण्याची अर्धी रॉयलटी 'युनिसेफ'ला दिली. याच्या जगभरातल्या प्रसारणानंतर हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अनेक देशांत १ल्या क्रमांकावर राहिलं तर अनेक देशांतील चार्टस मध्ये पहिल्या १०त. एकूण या गाण्याने 'युनिसेफ'लाही पुष्कळ पैसा मिळवून दिला.

तर असं हे "Chiquitita" गाणं.

'Chiquitita ' या स्पेनिश शब्दाचा अर्थ 'लहान मुलगी' असा आहे. 'युनिसेफ'च्या १९७९ च्या 'आंतरराष्ट्रीय बालकवर्षा'शी सुसंगत असं हे गाणं ऐका......


'ABBA'चं आणखी एक गाणं जे मला स्वत:ला खूप आवडतं.......

१९७९ साली प्रकाशित झालेलं हे गाणं एक अप्रतिम 'इन्स्पिरेशनल' गाणं आहे. साधे पण अर्थगर्भ शब्द, संथ पण सुंदर चाल, शेवटचा कोरस आणि फ्रीडाचा काळीज चिरत जाणारा आवाज...... सारंच कसं एकदम दुस~या जगातील वाटतं, नाही?

फक्त गाण्याची सुरुवात आणि शेवट ऐकून आपल्या बॉलीवूडच्या आणखी एका 'इन्स्पायर्ड' गाण्याची आठवण होते आणि आपल्याला पुन्हा याच जगात आणून ठेवते.



ही वानगी दाखल काही पण अशा अनेक गाण्यांनी मलाच काय पण जगभरातील असंख्य संगीतप्रेमींना भरभरून आनंद दिलाय. माझा हा प्रयत्न मात्र केवळ माझ्या मिपाकर मित्रांना ही माहिती आणि त्याद्वारे धकाधकीच्या जीवनात थोडा आनंद देण्याचाच आहे.

'अ‍ॅबा' हे खरोखरच पॉप संगीताला पडलेलं एक अत्यंत सुंदर स्वप्न होतं. या स्वप्नाने अनेक अप्रतिम गाण्यांची निर्मिती केली. प्रत्येक गाणं अगदी बावनकशी सोनंच जणू. १९८२ साली 'अ‍ॅबा'चे सदस्य आपापल्या मार्गाने जाण्यासाठी वेगळे झाले. त्यातल्या प्रत्येकाने स्वतंत्र वाट चालली आणि तिथेही काही प्रमाणात यशस्वी झाले पण एकत्रीतपणे अ‍ॅबाने जे यश पाहिले ते त्यांना पुन्हा मिळवणे शक्य झालेही नाही.


२००८ साली त्यांच्या संगीतावर आधारीत 'मामा मिया' नावाचा नितांत सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला. पिअर्स ब्रॉस्नन आणि मेरील स्ट्रीप यांच्या अप्रतिम अदाकारीने नटलेल्या या चित्रपटात अ‍ॅबाची पूर्वीची गाणी गुंफलेली आहेत. या गाण्यांच्या निमित्ताने बियॉर्न नि बेनी एकत्र आले. किमान मला तरी यामुळेच 'मामा मिया'तली गाणी पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली.

'अ‍ॅबा'बद्दल शेवटी मला जे वाटतं ते त्यांच्याच एका गाण्यात त्यांनी वर्णन केलं आहे असं मला वाटतं. बहुतेक तुम्हीही हे मान्य कराल. So lets say, ABBA, "Thank You For The Music For Giving It To Me"



No comments:

Post a Comment