९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय.
कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे. मग ते त्याच्या महत्त्वाची कागदपत्र कुठे नेऊन द्यायचं काम असो किंवा त्याच्या बहिणीच्या सासरी काही भेट-वस्तू द्यायचं काम असो, तो बुधाई रामलाच ते करायला सांगणार आणि वरती गावाबाहेर जिथे कुणाकडे पाठवलं असेल तिथून ताबडतोब परतही यायला सांगणार. मग बुधाई रामही त्याच्या सांगण्याप्रमाणे जराही दम न खाता ते काम करून लगेच परतणार. जमीनदाराचा इतर कुणापेक्षाही जास्त विश्वास बुधाई रामवरच असतो. एक दिवस बुधाईच्या सेवेचं बक्षीस म्हणून जमीनदार त्याला एक निंबाचं रोपट देतो आणि त्याला त्याच्या घराजवळ ते लावायला सांगतो. तो हे ही सांगतो की ते रोप वाढलं आणि त्याचा वृक्ष झाला तर त्या झाडाची सावली इतकी जमीन त्याची.
बुधाई आपल्या घरासमोर ते रोप रुजवतो आणि कालांतराने त्याचा वृक्ष बनतो आणि त्याखालच्या सावलीची जमीन त्याची होते असं तो मानतो. बुधाईच्या अगदी साध्या इच्छा-आकांक्षा असतात. आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि आपल्यासारखा हरकाम्या न बनता जीवनात यशस्वी व्हावं. पण दरम्यान जमीनदाराचं त्याच्या मेहुण्याबरोबर (बहिणीचा नवरा) इस्टेटीवरून वाद होतो आणि या वादात निंबाच्या सावलीची जमीन आपली समजणारा बुधाईही ओढला जातो आणि सुरू होतो एका सामान्य माणसाचा आपली जमीन वाचवण्यासाठीचा लढा. त्याचा मुलगा सुखाई त्याच्या इच्छेप्रमाणे शिकून या लढ्यात बुधाईचं अस्त्र बनतो आणि त्यांच्या जमिनीसाठी लढणा-या दोन्ही जमिनदारांना पुरून उरतो. पुढे खासदार बनलेल्या सुखाई रामने आपल्या मेहुण्याविरुद्धच्या इस्टेटीच्या तंट्यात मदत करावी म्हणून जमीनदार ती निंबाच्या झाडाखालची जमीन बुधाईला कायमची बक्षीस म्हणून देऊन टाकतो आणि अखेर बुधाई निंबाच्या झाडाखालच्या जमिनीचा कायदेशीर मालक बनतो.
अशी काहीशी कथा असणा-या या मालिकेत नेमकं चांगलं काय होतं ते आत्ता व्यवस्थित कळतंय.
पहिलं म्हणजे बुधाई रामचं काम करणारा होता पंकज कपूर. पंकज कपूर हे काम करत होता म्हंटलं तर चुकीचं होईल. तो ती भूमिका जणू जगत होता. एका जवळ जवळ वेठबिगारी करणा-या माणसाला निंबाच्या झाडाने दिलेली एक छोटीशी आशा, पुढे त्या माणसाला त्या झाडाशीच संलग्न करते ते पंकज कपूरने अप्रतिमरीत्या दाखवलं होतं. असं म्हणतात की नाटकातलं एक पात्र हे जबरदस्त ताकदीचं तेव्हाच वाटतं जेव्हा
त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचं विरोधी पात्र असतं. पंकज कपूरच्या
बुधाईसमोर असं जमिनदाराचं पात्र रंगवलेलं एस. एम. झहिर यांनी. त्यांनी
जमिनदाराचा आढ्यतखोर स्वभाव, मुरब्बी राजकारणीपणा, मुजोरपणा आणि आधी
मेहुण्यासमोर आणि नंतर सुखाईसमोर आलेली अगतिकता खुमासदार रीतीने दाखवली
आहे. या दोघांना तश्या भूमिका ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीने निर्माण करून
दिल्या ते होते प्रसिद्ध कथाकार, पटकथाकार आणि शायर डॉ. राही मासून रजा. या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं गुरबीर सिंह ग्रेवाल यांनी. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारासचं उत्तर भारतातलं गाव, तिथली जमिनादारीची प्रथा, वेठबिगा-यांचं आयुष्य रजा-ग्रेवाल जोडीने फारच छान निर्माण केलेलं.
पण हे सर्व असूनही या मालिकेचा उत्कर्ष बिंदू होता त्याचं शीर्षक गीत. निदा फाजली या जबरदस्त शायरचे चपखल शब्द आणि त्या शब्दांना साजेसा जगजीत सिंहांचा अप्रतिम स्वर. मालिका आणि शीर्षक गीत यांचा समर्पक संबंध असेलच असं आपल्याला नेहमीच दिसत नाही पण जितकी ही मालिका सुंदर होती तितकंच त्याचं हे शीर्षक गीतही.
जगजीत सिंहांच नुकतंच झालेलं देहावसान मला या गीताची आठवण करून गेलं. या आणि अशा सुंदर गीतांद्वारे ते अजूनही आपल्यात उपस्थित आहेत.
दिल के दर्द को जाने कौन
आवाजों के बाज़ारों में,
खामोशी पहचाने कौन !!
सदियों-सदियों वही तमाशा,
रस्ता-रस्ता लम्बी खोज,
लेकिन जब हम मिल जाते हैं,
खो जाता हैं जाने कौन !!
वो मेरा आईना हैं,
मैं उस की परछाई हूँ,
मेरे ही घर में रहता हैं,
मुझ जैसा ही जाने कौन !!
किरन-किरन अलसाता सूरज,
पलक-पलक खुलती नींदें,
धीमे-धीमे बिखर रहा हैं,
ज़र्रा-ज़र्रा जाने कौन !!
-निदा फ़ाज़ली
No comments:
Post a Comment